सध्या फेस मास्क अत्यंत महत्वाचा आहे. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी चेहऱ्याला मास्क बांधणे आवश्यक आहे. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कदाचित याचा विसर पडला असावा. डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी चेहऱ्याला मास्क न बांधताच एरिझोनामधील न्यू मेडिकल मास्क फॅक्टरीचा दौरा केला. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एरिझोना प्रांतामधून मताधिक्क्य मिळेल अशी त्यांना आशा आहे.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अमेरिकन नागरिक सध्या प्रवास करणे टाळत आहेत. एरिझोना प्रांतातील फोनिक्स शहरामध्ये दुपारी दाखल झाल्यानंतर ट्रम्प यांनी हनीवेल इंटरनॅशनल फॅक्टरीला भेट दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी या फॅक्टरीमध्ये N95 मास्क बनवले जात आहेत. करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करताना सुरक्षा उपकरणाची कमतरता निर्माण झाल्याने हनीवेल इंटरनॅशनल फॅक्टरीत एन ९५ मास्क बनवण्याचे काम सुरु आहे.
आणखी वाचा- आणखी बळी गेले तरी चालतील, अर्थव्यवस्थेला चालना देणं महत्वाचं – डोनाल्ड ट्रम्प
करोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा
करोना व्हायरसच्या फैलावावर नियंत्रण मिळवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ‘अमेरिका आता करोना व्हायरसविरुद्ध लढाईच्या पुढच्या टप्प्यात आहे. हा सुरक्षित टप्पा असून, हळूहळू काही गोष्टी सुरु होतील’ असे ट्रम्प म्हणाले. त्यांनी अमेरिकन नागरिकांचे आभार मानले व असंख्य लोकांचे प्राण वाचवल्याचा दावा केला.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या अहवालानुसार अमेरिकेत करोना व्हायरसमुळे ७१ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १२ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे. मागच्या एका आठवडयात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढलेली नाही तसेच मृत्यू सुद्धा कमी झाले आहेत त्यामुळे ट्रम्प यांनी करोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे.