भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. टी. एस. ठाकूर यांची निवड झाल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. न्या. ठाकूर हे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश असून ते विद्यमान सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्याकडून २ डिसेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत.
सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी न्या. ठाकूर यांच्या नावाची शिफारस केली. विधी मंत्रालयाने न्या. ठाकूर यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखविल्यानंतर त्याबाबतची फाइल पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
त्यानंतर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी त्याला मान्यता दिल्यानंतर त्याबाबतचा आदेश जारी केला जाणार आहे. न्या. ठाकूर हे भारताचे ४३ वे सरन्यायाधीश असतील.
न्या. ठाकूर यांचा जन्म ४ जानेवारी १९५२ रोजी झाला. त्यांनी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात आपली कारकीर्द सुरू केली आणि दिवाणी, फौजदारी, करविषयक आदी सर्व प्रकारचे खटले लढविले. न्या. ठाकूर यांची १७ नोव्हेंबर २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.