पीटीआय, मोरबी : गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील मिठाच्या पॅकेजिंग कारखान्यातील एक भिंत कोसळून बुधवारी झालेल्या अपघातात किमान १२ मजूर ठार झाले. ही घटना हालवाड औद्योगिक क्षेत्रातील सागर सॉल्ट फॅक्टरीत घडली. भिंत कोसळल्याने किमान १२ मजूर मरण पावले आहेत. काही जण ढिगाऱ्याखाली दबलेले असल्याची शंका असून, त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत, असे राज्याचे श्रम मंत्री व स्थानिक आमदार ब्रिजेश मेरजा यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ‘माझ्या शोकसंवेदना शोकसंतप्त परिवारांसोबत आहेत. स्थानिक अधिकारी दुर्घटनाग्रस्तांना शक्य ती सर्व मदत करत आहेत’, असे ट्वीट मोदी यांनी केले. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची भरपाई दिली जाईल, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आणि राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी बोलून बचाव कार्याबाबत माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.