ट्विटरकडून याआधी गेल्या आठवड्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट लॉक केलं होतं. त्यानंतर गुरुवारी सकाळी ट्विटरनं काँग्रेसच्या अजून काही नेतेमंडळींची अकाऊंट्स लॉक केल्यानंतर आता थेट काँग्रेस पक्षाचंच मुख्य अकाऊंट ट्विटर इंडियानं लॉक केलं आहे. यासाठी नियमांचा भंग केल्याचं कारण ट्विटरकडून दिलं गेल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मात्र थेट मोदी सरकरावरच निशाणा साधण्यात येत असून ट्विटर इंडिया मोदी सरकारच्या दबावाखाली हे काम करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. दरम्यान, अशा कोणत्याही गोष्टीमुळे लोकांसाठी आवाज उठवण्यापासून पक्षाला कुणी थांबवू शकणार नाही, असं काँग्रेसनं म्हटलंय. आपल्या इस्ट्राग्राम हँडलवरून काँग्रेसनं ही पोस्ट केली आहे.

“आम्ही तेव्हाही जिंकलो होतो, आम्ही पुन्हा जिंकू!”

काँग्रेसनं इन्स्टाग्राम पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यावर पोस्टमध्ये “मोदीजी, तुम्ही किती घाबरता? काँग्रेस पक्षानं आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे. फक्त सत्य, अहिंसा आणि लोकांच्या इच्छेच्या जोरावर हे झालं. आम्ही तेव्हाही जिंकलो होतो, आम्ही पुन्हा जिंकू”, असं या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Congress (@incindia)

काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख रोहन गुप्ता यांनी पक्षाचं ट्विटर अकाउंट लॉक करण्यात आल्याची माहिती एएनआयशी बोलताना दिली आहे. “केंद्र सरकारच्या दबावाखाली ट्विटर इंडिया हे काम करत आहे. ट्विटरनं आत्तापर्यंत देशभरातील ५ हजारहून जास्त काँग्रेस नेत्यांची खाती लॉक केली आहे”, असं रोहन गुप्ता यांनी म्हटलं आहे. शिवाय, “जर पीडितेचा फोटो ट्विटरवर ठेवणं हे पॉलिसीचं उल्लंघन आहे, तर मग अनुसूचित जाती आयोगाच्या ट्विटर हँडलवर २ ऑगस्टपासून ५ ऑगस्टपर्यंत पीडितेचा फोटो का होता?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

 

ट्विटरची आणखी एक कारवाई; राहुल गांधींच्या नंतर काँग्रेसच्या ५ नेत्यांचे अकाऊंट लॉक

“४ ऑगस्ट रोजी राहुल गांधींनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यांच्यासाठी आवाज उठवला. पण ट्विटरनं लगेचच त्यांचं अकाउंट लॉक केलं आणि त्यांचं ट्वीट डिलीट केलं. हा दुजाभाव आहे. यात ट्विटरच्या पॉलिसीचा काहीही संबंध नसून ते केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे”, असा देखील आरोप रोहन गुप्ता यांनी केला आहे.