ओटावा : खलिस्तान समर्थक शीख फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जरची जूनमध्ये झालेल्या हत्याप्रकरणी दोन संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे. हे दोघे अजूनही कॅनडातच असल्याचे सांगण्यात येत आहे. कॅनडाचे पोलीस लवकरच ही कारवाई करण्याची शक्यता आहे. येथील प्रसारमाध्यमांत या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> अशांत स्थितीतही भारत-रशिया संबंध प्रगतीपथावर; रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रतिपादन
कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात जूनमध्ये निज्जरची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली होती. ‘द ग्लोब अँड मेल’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पोलिस सध्या संशयितांवर पाळत ठेवून आहेत आणि काही आठवडय़ांत त्यांना पकडले जाण्याची शक्यता आहे. निज्जरच्या हत्येनंतर हे दोन संशयित मारेकरी कॅनडा सोडून गेले नाहीत आणि पोलिस अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर पाळत ठेवून होते, अशी माहिती देणाऱ्या तीन अज्ञात स्रोतांकडून मिळाल्याचे वृत्तपत्राने म्हटले आहे. सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी १८ जून रोजी सरे शहरातील गुरुद्वाराबाहेर ४५ वर्षीय खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे भारतीय हस्तकांचा संभाव्य सहभाग असल्याचा आरोप केला होता. भारताने ट्रुडो यांचे आरोप बिनबुडाचे ठरवून फेटाळले होते. त्यानंतर उभय देशांत तणाव निर्माण वाढला आहे. भारताने २०२० मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते.
हेही वाचा >>> अयोध्येतील रेल्वे स्थानकानंतर आता विमानतळाचंही नाव बदललं, टर्मिनल इमारतीला श्रीराम मंदिराचं रुप
बुधवारी प्रसिद्ध झालेल्या या वृत्तात नमूद केले, की औपचारिक आरोपपत्र दाखल केल्यानंतर पोलीस मारेकऱ्यांचा कथित सहभाग आणि त्यांचे भारत सरकारशी संबंध उघड करतील. ‘ग्लोबल न्यूज’ने ‘बीसी गुरुद्वारा कौन्सिल’चे प्रवक्ते मोनिंदर सिंग यांचा संदर्भ देत म्हटले आहे की, दोन जणांना अटक केली जाऊ शकते असे सांगितले जात असल्याने, यामुळे भारतीय वंशाच्या समुदायातील लोकांना दिलासा मिळेल.
निज्जर यांच्या हत्येप्रकरणी अटकेबाबत प्रसारमाध्यमांत येत असलेल्या बातम्यांबाबत त्यांना कल्पना आहे. मात्र तपास सुरू असल्याने याबाबत प्रतिक्रिया देण्यास पथकाने नकार दिला.