Crime News : तामिळनाडूतील एक तीर्थक्षेत्र असलेले तिरुवण्णामलाई या शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनीच तिरुवण्णामलाई शहरातील Endal बायपास रस्त्याजवळ आंध्र प्रदेशातील एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी दोन पोलीस कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हवलदार सुरेश राज आणि सुंदर अशी आरोपींची नावे आहेत. सोमवारी रात्री उशिरा हे दोघे गस्तीवर होते. तेव्हा त्यांना आंध्र प्रदेशच्या चित्तूर येथून आलेले वाहन रोखले.

या वाहनात नातेवाईक असलेल्या दोन महिला प्रवास करत होत्या, ज्या राज्यातील एका अत्यंत प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या अरूणाचलेश्वर मंदिराकडे जात होत्या. तपासकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचार्‍यांनी नियमित वाहन तपासणीसाठी महिलांना वाहनातून खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी वयाने लहान असलेल्या महिलेला बळजबरीने वेगळे केले आणि जवळच्या एका जंगलात ओढत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. ही घटना कथितपणे दुसऱ्या महिलेच्या उपस्थितित झाली.

मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हवालदारांनी महिलेला रस्त्याच्या कडेला सोडून दिले. जवळच्या विट भट्टीतील कामगारांनी आणि स्थानिक रहिवाशांना त्या आढळून आल्या आणि त्यांनी राज्यातील आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा क्रमांक १०८ ला कळवले. पीडितेला तिरुवण्णामलाई सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे त्यांनी लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी केली. त्यानंतर तिरुवण्णामलाई पोलिस त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले आणि त्यांचा जबाब घेतला. यानंतर अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि काही तासांतच पोलीस हवालदारांना अटक करण्यात आली.

दोन्ही आरोपींना स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले, त्यानंतर त्यांना वेल्लोर मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की संपूर्ण चौकशी होईपर्यंत त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान वेल्लोर रेंजचे डीआयजी जी धर्मराजन आणि तिरुवन्नमलाईचे पोलिस अधीक्षक एम सुधाकर यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत.