मालदीवमध्ये सुरु असलेल्या आणीबाणीत आता माध्यमांची मुस्काटदाबी सुरु झाली असून दोन भारतीय पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था एएफपीसाठी काम करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


एएनआयच्या बातमीनुसार, अमृतसरच्या मनी शर्मा आणि लंडनमध्ये राहणारा मुळचा भारतीय असणारा पत्रकार आतिश रावजी पटेल या दोघांना मालदीवच्या सरकारने ताब्यात घेतले आहे. त्यांना मालदीवच्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना मालदीवचे खासदार अली जहीर यांनी सांगितले की, आता येथे माध्यमांचे स्वातंत्र्य राहिलेले नाही. इथल्या आणीबाणीच्या स्थितीचे वार्तांकन करणाऱ्या एका वृत्त वाहिनीचे प्रक्षेपणही काल रात्री बंद करण्यात आले. आम्ही या पत्रकारांच्या सुटकेची आणि देशात लोकशाही लागू करण्याची मागणी करीत आहोत. भारताचा शेजारी देश असणारा मालदीव सध्या राजकीय संकटात सापडला आहे.

मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्यावर नव्याने दहशतवादविरोधी खटला चालविण्याचा आदेश देतानाच १२ विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुटका करण्याचे आदेश गुरुवारी रात्री दिले. त्यानंतर मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी देशात १५ दिवसांची आणीबाणी घोषित केली असल्याचे त्यांच्या सहकारी मंत्री अझिमा शुकूर यांनी सोमवारी सरकारी दूरचित्रवाहिनीवर जाहीर केले. यामुळे या देशातील राजकीय संकट आणखी गडद झाले आहे.

या निर्णयामुळे सुरक्षा दलांना संशयितांना अटक करण्याचे आणि स्थानबद्ध ठेवण्याचे अमर्याद अधिकार मिळाले आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि सरकार यांच्यातील तणावाचे संबंध पराकोटीला पोहचले असताना ही घडामोड घडली आहे. जगभरातून दबाव वाढत असतानाही राजकीय कैद्यांची सुटका करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास अध्यक्षांनी नकार दिला आहे.

न्यायाधीशांनी त्यांचा निर्णय फिरवावा असे आवाहन करणारी तीन पत्रे अध्यक्षांनी त्यांना लिहिल्यानंतर काही वेळातच शकूर यांनी सरकारी दूरचित्रवाहिनीवर आणीबाणीची घोषणा वाचून दाखवली. यामीन यांनी आणीबाणी जाहीर करण्याची ही दुसरी वेळ आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये त्यांच्या कथित हत्येचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी हेच पाऊल उचलले होते.

देशाच्या घटनेनुसार अध्यक्षांनी आणीबाणीबाबतच्या निर्णयाची माहिती दोन दिवसांत संसदेला देणे आवश्यक आहे, मात्र अधिकाऱ्यांनी संसद बेमुदत स्थगित केली आहे.

मालदीवमधील ताज्या घडामोडींबाबत भारताने चिंता व्यक्त केली असून, नागरिकांनी आवश्यक नसल्यास त्या देशात प्रवास करू नये असे आवाहन केले आहे. भारतातून मालदीवमध्ये स्थलांतरित झालेल्या भारतीयांनी सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणे टाळावे, अशा सूचना परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. मालदीवमधील राजकीय घडामोडी आणि त्यातून उद्भवलेली कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हा सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे अत्यंत आवश्यक असल्याशिवाय भारतीय नागरिकांनी मालेला जाणे रहित करावे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two indian reporters employed with afp news agency arrested in maldives
First published on: 09-02-2018 at 20:32 IST