पेशावर शहराच्या वायव्य भागांत गुरुवारी चार सशस्त्र इसमांनी पोलिसांच्या वाहनावर केलेल्या हल्ल्यात दोन जण ठार झाले असून, पाकिस्तानच्या पोलीस दलातील एक उच्चपदस्थ अधिकारी गंभीर जखमी झाला आहे.
फ्रॉण्टियर रिझव्‍‌र्ह पोलीस दलातील डेप्युटी कमांडर गुल वली खान यांना अनेक गोळ्या लागल्या असून ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आपल्या घरातून कार्यालयाकडे जात असताना चार इसमांनी त्यांच्या वाहनावर हल्ला चढविला त्यामध्ये खान जखमी झाले, तर त्यांच्या वाहनाचा चालक आणि अंगरक्षक ठार झाले. बेछूट गोळीबार केल्यानंतर चार हल्लेखोर दोन मोटारसायकलींवरून पसार झाले, असे पोलिसांनी सांगितले.
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारली नसली तरी पोलीस अधिकाऱ्यांवर तालिबान्यांकडून हल्ले होण्याचे प्रकार होत आहेत. सिंध प्रांतातील सुक्कूर येथील आयएसआयच्या कार्यालयावर आत्मघातकी बंदूकधाऱ्याने हल्ला चढविल्यानंतर काही तासांतच हा हल्ला करण्यात आला आहे.