कुख्यात गँगस्टर छोटा राजन याच्यावर कथित खंडणीखोरी आणि खुनाचा प्रयत्न यापोटी सीबीआयने ‘मोक्का’खाली दोन नवे गुन्हे दाखल केल्यामुळे त्याच्यापुढील अडचणींत भर पडली आहे.

२०१३ साली छोटा राजन टोळीच्या गुंडांनी बिल्डर अजय गोसालिया व अर्शद शेख यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात सीबीआयने तपास सुरू केला आहे. दोन शूटर्सनी मुंबईच्या मालाडमधील एका मॉलच्या बाहेर गोसालिया याच्यावर केलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला होता. हे राजन टोळीच्या लोकांचेच काम असल्याचे मानले जात असून त्यापैकी अनेकांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

दुसरे प्रकरण राजनचा हस्तक भरत नेपाळी व राजनच्या टोळीचे सदस्य यांनी नीलेश नावाच्या व्यक्तीकडून २० लाख रुपयांची खंडणी उकळल्याचे आहे. नीलेशला गुंडांनी जिवे मारण्याच्या धमक्या दिल्यानंतर त्याने ही रक्कम देण्याचे मान्य केल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. नियमांनुसार, सीबीआयच्या एफआयआरमध्ये राजन याचे नाव नोंदवण्यात आलेले नाही.