Why Rohit Godara-Goldy Brar gang wants to kill comedian Munawar Faruqui? : स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मुनव्वर फारुकी हा आता गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांच्या निशाण्यावर आला आहे. हिंदू देवी-देवतांवर फारुकीने केलेल्या विनोदांमुळे हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करत त्याला या गँगकडून लक्ष्य केले जात असल्याचे मानले जात आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, नुकतेच दिल्ली पोलिसांच्या काउंटर-इंटेलिजन्स टीमने दिल्लीत फारुकीच्या हत्येचा कट उधळून लावल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी याबद्दल माहिती दिली.
नेमकं काय झालं?
एनडीटीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या काउंटर-इंटेलिजन्स टीमला माहिती मिळाली होती की हरियाणामधील तिहेरी हत्या प्रकरणातील आरोपी राहुल आणि साहिल हे नुकतेच दिल्लीत दिसून आले आहेत. पोलिसांनी या दोघांना पकडण्यासाठी सापळा रचला. हे शूटर पहाटे ३ वाजता दुचाकीवर असताना पोलिसांनी त्यांना थांबण्यास सांगितले. पण त्यांनी पोलिसांवरच गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर देत आरोपींच्या पायावर गोळी घातली आणि त्यांना ताब्यात घेतले.
या आरोपींच्या चौकशीदरम्यान पोलिसांना आढळून आले की शूटर हे परदेशात बसलेल्या गोदरा आणि गोल्डी ब्रार यांच्या सूचनांवरून फारुकी याला लक्ष्य करण्यासाठी दिल्लीत आले होते. पोलिसांना असेही आढळून आले की शूटर्सनी दिल्लीत येण्याच्या आधी फारुकी याची मुंबई आणि बंगळुरू येथे रेकी केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शूटर्सनी बेंगळुरूमध्ये फारुकी याला लक्ष्य करण्याचा कट रचला होता आणि ते एका कार्यक्रमाच्या ठिकाणी त्याची वाट पाहत होते. परंतु फारुकी वेगळ्या गाडीने निघून गेला आणि त्यामुळे त्यांचा प्लॅन यशस्वी ठरला नाही.
मुनव्वर फारुकी ३३ वर्षीय कॉमेडियन यापूर्वीही हिंदू देवतांवरील आपल्या विनोदांमुळे अडचणीत आला आहे. २०२१ मध्ये त्याला हेट स्पीच कायद्यांतर्गत मध्य प्रदेशमध्ये अटक करण्यात आली होती. त्याला एक महिन्याहून अधिक काळ तुरूंगात काढावा लागला होता, त्यानंतर त्याला जामीन मिळाला. गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी अवैध हुक्का बारवर टाकलेल्या धाडीत त्याला ताब्यात घेण्यात आले होते आणि नंतर त्याची जामीनावर सुटका झाली. स्टँड-अप कॉमेडीबरोबरच मुनव्वर फारुकीने अनेक टीव्ही शोमध्ये भाग घेतला आहे आणि तो ‘बिग बॉस’चा विजेता देखील आहे.