पीटीआय, श्रीनगर

जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी रात्रभर झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आणि दोन जवान जखमी झाले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कुलगाममध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा शनिवारी नववा दिवस होता. काश्मीर खोऱ्यात आतापर्यंत हाती घेतलेल्या सर्वात मोठ्या मोहिमांपैकी ही मोहीम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लष्कराच्या श्रीनगरस्थित ‘चिनार कोअर’ने ‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये, लान्स नायक प्रितपाल सिंग आणि शिपाई हरमिंदर सिंग या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि मोहीम अजूनही सुरू असल्याची माहिती दिली. या मोहिमेत जखमी झालेल्या जवानांची संख्या आता नऊ झाली आहे.

जम्मू आणि काश्मीरचे पोलीसप्रमुख नलिन प्रभात आणि लष्कराचे नॉर्दर्न कमांडर लेफ्टनंट जनरल प्रतिक शर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि लष्करी अधिकारी मोहिमेचा सातत्याने आढावा घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. १ ऑगस्टला सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. कुलगाम जिल्ह्यातील अखल येथील जंगलात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्या भागाची घेराबंदी करून शोधमोहीम हाती घेतली.

मारल्या गेलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही, तसेच ते कोणत्या संघटनेचे सदस्य होते याचीही माहिती मिळालेली नाही. दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी सुरक्षा दलांकडून ड्रोन आणि हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. तसेच पॅरा कमांडोही सुरक्षा दलांना मदत करत आहेत.

मी लान्स नायक प्रितपाल सिंग आणि शिपाई हरमिंदर सिंग या शूरवीरांच्या दुर्दम्य धाडसाला सलाम करतो. त्यांनी मातृभूमीच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्यांचे शौर्य, हिंमत आणि दृढनिश्चय कधीही विस्मरणात जाणार नाही. मी त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन करतो. – मनोज सिन्हा, नायब राज्यपाल, जम्मू-काश्मीर

किश्तवारमध्ये २६ घरांची झडती

जम्मू : जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी शनिवारी किश्तवार येथे २६ घरांची झडती घेतली. दहशतवाद यंत्रणेच्या विरोधातील मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. झडती घेण्यात आलेल्या घरांमध्ये ‘हिजबुल मुजाहिदीन’चा दहशतवादी मोहम्मद अमिन भट उर्फ जहांगीर सरूरी याच्याहीही घराचा समावेश होता. त्याशिवाय पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांच्या घरांना मुख्यतः लक्ष्य करण्यात आले. हे दहशतवादी सीमेपलिकडून शस्त्रे आणि दारुगोळ्याची तस्करी करतात अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.