अल-कायदाशी संबंध असल्याचा संशय असलेल्या विद्यार्थी संघटनांविरुद्ध पाकिस्तान सरकारने व्यापक मोहीम हाती घेतली असून त्यादरम्यान दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे मोहम्मद उमर आणि मोहम्मद आरसलन अशी आहेत. पंजाब विद्यापीठातून अल-कायदाशी संबंधित तीन संशयित विद्यार्थ्यांना काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेले उमर आणि आरसलन हे लाहोरमधील खासगी विद्यापीठातील विद्यार्थी आहेत. अल-कायदाशी संबंधित असलेले आणखी काही दहशतवादी ३२ हजार विद्यार्थी वास्तव्याला असलेल्या वसतिगृहात आहेत, असे पंजाब विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. मुजाहीद कामरान यांनी सांगितले. संशयितांना अटक करण्यासाठी गुप्तचर यंत्रणांना आम्ही वसतिगृहावर छापे टाकण्याची पूर्ण मोकळीक दिली असल्याचे प्रा. कामरान म्हणाले.
दरम्यान, इस्लामी जमियात तलबा या विद्यार्थी संघटनेशी संबंधित अनेक विद्यार्थी पंजाब विद्यापीठात असून त्यांनी वसतिगृहात दहशतवादी दडून बसले असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. तथापि, प्रा. कामरान यांनी, इस्लामी जमियात तलबाच्या काही विद्यार्थ्यांचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे म्हटले आहे.