Guillain-Barré Syndrome in Kolkata: राज्यात गुइनेल बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. महाराष्ट्रातील आरोग्याची ही समस्या हाताळण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली असून, त्यातील १६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यानंतर आता पश्चिम बंगालमध्येही जीबीएसने थैमान घातले आहे. जीबीएसमुळे १० आणि १७ वर्षीय अशा दोन मुलांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० वर्षीय मुलाला कोलकाता येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना रविवारी त्याचा मृत्यू झाला. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील या मुलावर बीसी रॉय रुग्णालयात आठवडाभर उपचार सुरू होते.

दरम्यान उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील १७ वर्षीय मुलाचाही गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या मुलाला जीबीएसचे लक्षणे दाखवत होती. तसेच त्याच्यावर कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाचा जीबीएसच्या लक्षणामुळे मृत्यू झाला असल्याची शक्यता आहे. पण मृत्यूच्या खऱ्या कारणाचा अद्याप शोध घेतला जात आहे.

तसेच आजत हुगळी येथील ४८ वर्षीय इसमाचाही गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे मृत्यू झाल्याचे कळत आहे. धनियाखली येथे राहणारा हा रुग्ण आजारी पडल्यानंतर स्थानिक डॉक्टरकडे गेला होता. त्याच्या लक्षणाची तपासणी केल्यानंतर त्याला तात्काळ कोलकाता येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. या रुग्णाला मागच्या चार दिवसांपासून डायरिया झाला होता, तसेच त्याच्या कमरेखालच्या शरीराला अर्धांगवायूचा झटका आला होता. कोलकाता येथील रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुइलेन बॅरे सिंड्रोम पासून काळजी कशी घ्यावी?

  • पाणी पिण्याआधी उकळून घ्या.
  • भाज्या आणि फळे स्वच्छ धुवून खा.
  • चिकन आणि मांस व्यवस्थित शिजवून खा.
  • अंडी, माशांसह इतर पदार्थ कच्चे खाऊ नका.
  • जेवणाआधी आणि स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुवा.
  • खाण्याचे भांडे अथवा अन्नाची दुसऱ्याशी देवाणघेवाण करू नका.
  • कच्चे अन्न आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवा.
  • स्वयंपाकघराचा ओटा आणि भांडी निर्जंतूक करून घ्या.

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा विकार योग्य उपचारानंतर पूर्णपणे बरा होतो. नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे. याचबरोबर बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. या विकाराची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे न्यूरॉलॉजिकल सोसायटी ऑफ पुणे, या संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल कुलकर्णी म्हणाले आहेत.