Donald Trump On Thailand-Combodia Dispute : थायलंड आणि कंबोडियामधील सीमावाद आता शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले करण्यात येत असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या प्राणघातक चकमकींमुळे हे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. या चकमकीत जवळपास डझनभर थाई सैनिक ठार झाले. थायलंडकडून करण्यात आलेल्या प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ल्यांमुळे संघर्ष वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
दोन्ही देश एकमेकांवर हिंसा भडकवण्याचा आरोप करत आहेत. दरम्यान, या दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी आता अमेरिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. कंबोडिया आणि थायलंडबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चा केली असून दोन्ही देशांनी सकारात्मकता दर्शवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. कंबोडिया आणि थायलंडबरोबर झालेल्या चर्चेबद्दल ट्रम्प यांनी समाधान व्यक्त केलं. मात्र, जोपर्यंत संघर्ष थांबत नाही, तोपर्यंत आपण दोन्ही देशांबरोबर व्यापार करार अंतिम करण्याच्या दिशेने पुढे जणार नसल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी म्हटलं की, “कंबोडिया आणि थायलंड या दोन्ही सीमावर्ती देशांच्या प्रतिनिधींशी आम्ही चर्चा केली. ते सध्या संघर्षात अडकले आहेत. दोन्ही देशांना तात्काळ युद्धबंदी हवी आहे. दोन्ही देशांना शांतता हवी आहे. तसेच त्यांना अमेरिकेसोबत व्यापार चर्चेत पुन्हा सहभागी व्हायचं आहे. मात्र, युद्ध थांबेपर्यंत व्यापाराबद्दल बोलणं योग्य नाही असं मला वाटतं. त्यामुळे आपण याबाबत लवकरच पाहू”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
“दोन्ही देशांनी सहमती दर्शवल्यानंतर शेवटी शांततेसाठी प्रयत्न केले जातील. या दोन्ही देशांशी संवाद साधणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. त्यांच्याकडे समृद्ध आणि ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आहे. येणाऱ्या काळात ते एकमेकांसोबत शांतीने राहतील अशी मला आशा आहे. जोपर्यंत संघर्ष थांबत नाही तोपर्यंत असं करणं अयोग्य आहे. शांतता प्रस्थापित होईल, तेव्हा मी या दोन्ही देशांबरोबर व्यापार करार अंतिम करण्याच्या दिशेने पुढे जाण्यास उत्सुक आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.
थायलंड आणि कंबोडियामध्ये संघर्ष का होतोय?
सध्याच्या सुरू असलेल्या संघर्षाचं कारण म्हणजे या वादग्रस्त भागात झालेल्या भूसुरुंग स्फोटांची मालिका. २३ जुलै रोजी थायलंडच्या उबोन रत्वाथानी प्रांतात एका भूसुरुंग स्फोटात तीन थाई सैनिक जखमी झाले आणि एका सैनिकाला पाय गमवावा लागला. या प्रांतातील गस्ती मार्गांवर नव्याने टाकलेले रशियन बनावटीचे भूसुरूंग होते. त्यानंतर थाई सैन्याने कंबोडियावर ओटावा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.
या करारानुसार भूसुरुंगाच्या वापर व उत्पादनावर बंदी आहे. प्रत्युत्तर म्हणून कंबोडियन संरक्षण मंत्रालयाने नवीन भूसुरूंग टाकण्यास नकार दिला. त्यांनी असा युक्तिवाद केला की, थायलंडने गस्तीसाठी मान्य केलेल्या मार्गांच्या वापराबाबत असलेल्या कराराचे उल्लंघन केले आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल माली सोचेता यांनी म्हटले, “भूसुरुंगाचा स्फोट कंबोडियन भूभागावर झाला. हा प्रदेश भूतकाळातील युद्धे आणि दशकांच्या अशांततेतील न फुटलेल्या शस्त्रांनी भरलेला आहे.”