Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागच्या काही महिन्यांपासून सातत्याने कोणत्या न कोणत्या मुद्यांवरून चर्चेत असतात. खरं तर ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाचा जगातील अनेक देशांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. ट्रम्प हे सातत्याने भारतावर देखील टीका करत आहेत. ट्रम्प कायम जगावर आपला दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

असं असताना आता डोनाल्ड ट्रम्प यांचं एक विधान चांगलंच चर्चेत आलं आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या आर्थिक आणि जागतिक प्रभावाबद्दल एक मोठा दावा केला आहे. ‘अमेरिकेशिवाय जगातील सर्व काही नष्ट होईल’, असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना केलं आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाच्या आर्थिक आणि जागतिक प्रभावाबद्दल अनेक मोठे दावे केले. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या वाढीवरही सविस्तर भाष्य केलं. ट्रम्प यांनी म्हटलं की, “मी पहिल्या चार वर्षांत अर्थव्यवस्था खूप मोठी केली. परंतु नंतर बायडेन प्रशासनाने जे केलं त्यामुळे अर्थव्यवस्था बिघडू लागली.”

दरम्यान, अमेरिकेची आर्थिक ताकद वाढवण्यामध्ये टॅरिफची महत्वाची भूमिका असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी मत मांडलं आहे. त्यांनी म्हटलं की, “टॅरिफ आणि इतर गोष्टींमुळे येणारा पैसा खूप मोठा आहे. टॅरिफमुळे आपल्याला इतर गोष्टीही मिळतात.”

दरम्यान, ट्रम्प यांनी अमेरिकेचे वर्णन आर्थिकदृष्ट्या सर्वोत्तम असं केलं. भारताच्या कर धोरणांवर पुन्हा एकदा टीका करताना त्यांनी हार्ले-डेव्हिडसनचा उल्लेख करून अनुचित व्यापार पद्धतीचं उदाहरण दिलं. ट्रम्प यांनी म्हटलं की, नवी दिल्ली जगात सर्वाधिक शुल्क लादते, तर अमेरिका भारतीय वस्तूंना कमीत कमी अडथळ्यांसह त्यांच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यास परवानगी देते, असं म्हणत पुन्हा एकदा भारतावर टीका केली.

ट्रम्प यांनी न्यायालयाच्या टिप्पणीवर काय म्हटलं?

दरम्यान, अमेरिकेच्या फेडरल अपील न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाने लादलेले बहुतेक शुल्क कायद्यानुसार नसल्याचं म्हटलं. मात्र, न्यायालयाच्या या टिप्पणीवर ट्रम्प चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. ‘जर शुल्क आकारलं नाही तर अमेरिका पूर्णपणे नष्ट होईल आणि लष्करी शक्ती देखील नष्ट होईल’, असं त्यांनी म्हटलं. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवरील एका पोस्टमध्ये म्हटलं की, जबाबदारी आणि आम्ही आधीच घेतलेल्या सर्व ट्रिलियन डॉलर्सशिवाय आपला देश पूर्णपणे नष्ट होईल आणि आपली लष्करी शक्ती संपेल. मात्र, एका कट्टरपंथी डाव्या विचारसरणीच्या न्यायाधीशांच्या गटाला त्याची पर्वा नाही.