बोस्टन मॅराथॉनवर करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यातील आरोपी झोखर सारनेव्ह याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी अमेरिका करणार असल्याचे अ‍ॅटर्नी जनरल एरिक होल्डर यांनी सांगितले. या बॉम्बहल्ल्यात तीन जण ठार झाले होते तर २६० हून अधिक जखमी झाले होते.
गेल्या १५ एप्रिल रोजी झालेल्या या बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी चार दिवस कसून शोध घेत सारनेव्ह आणि त्याचा भाऊ तामरलेन (२६) यांना घेरले होते. त्यानंतर झालेल्या गोळीबारात तामरलेन ठार झाला तर झोखर जखमी झाला होता.
या दोघा भावांनी केलेल्या गुन्ह्य़ाचे स्वरूप पाहता त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्याची शिफारस करणे भाग पडल्याचे एरिक होल्डर यांनी सांगितले. या बॉम्बहल्ल्याबरोबरच सारनेव्ह याच्यावर शस्त्रांचा वापर करणे, कट रचणे आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट घडविणे आदी १७ गुन्हे नोंदविण्यात आले असून त्याबद्दल त्याला फाशी अथवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
अल-कायदाच्या ऑनलाइन मासिकातून माहिती घेऊन या दोन भावांनी बॉम्ब तयार केला होता, मात्र कोणत्याही संघटित दहशतवादी गटाकडून सहकार्य मिळाल्याचा त्यांच्यावर आरोप नाही.