मावळ लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार पार्थ पवार निवडणूक लढवत आहे. ही निवडणूक पवार कुटुंबासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यांच्यासाठी खुद्द उदयनराजे भोसले पार्थचा प्रचार करणार आहेत. शनिवारी संध्याकाळी निगडीत ते प्रचार सभा घेणार आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक स्थलांतरीत झाले आहेत. त्यातील बहुतांश नागरिक हे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात वास्तव्यास आहेत. या नागरिकांना राष्ट्रवादीकडे आकर्षून घेण्यासाठी उदयनराजेंना येथे आणण्यात आले आहे. ही सभा पिंपरी-चिंचवड प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवास मैदान येथे होणार आहे. त्यांच्यासोबत स्वतः अजित पवार, शिवेंद्रराजे भोसले, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, जेष्ठ नेते रामराजे निंबाळकर, शशिकांत शिंदे या नेत्यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

मावळ लोकसभेसाठी पार्थ पवार यांचे नाव अधिकृतरित्या जाहिर करण्यात आले, तेव्हापासून शहरातील कार्यकर्ते उत्साहात असून त्याचा प्रचार जोमाने करीत आहेत. ही निवडणूक पवार कुटुंबाच्या प्रतिष्ठेची झाल्याचे पाहायला मिळत असून आई सुनेत्रा पवार यांनी या निवडणुकीत स्वतः लक्ष देत पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी त्यांनी बैठका घेतल्या आहेत. तर जय पवार हे सोशियल मीडिया हाताळत असून रोहित पवार यांनी देखील अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर वडील अजित पवार यांची मुलगा पार्थचा प्रचार करताना दमछाक होताना दिसत आहे. दरम्यान, उदयनराजेंच्या सभेचा पार्थला कितपत फायदा होतो हे पाहणं महत्वाचं आहे.