Nathuram Godse Signboard in Karnataka कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील बोलो ग्रामपंचायतीमध्ये एका रस्त्याला नथुराम गोडसेंच्या नावाचा फलक लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार ‘कर्नाटकचे ऊर्जा मंत्री व्ही सुनील कुमार यांच्या मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. करकला तालुक्यातील बोलो ग्रामपंचायतीमध्ये नुकतेच एका रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानंतर ‘पदुगिरी नथुराम गोडसे रोड’ असा फलक रसत्याच्या कडेला लावलेला दिसून आला. मात्र, हा फलक सरकार किंवा पंचायत अधिकाऱ्यांनी लावला नसून कोणत्यातरी बदमाशांचे हे कृत्य असल्याचे सुनील कुमार यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी हा फलक काढून टाकला असून पोलीस त्या बदमाशांचा शोध घेत आहेत.
पंचायत अधिकारी आणि पीडीओकडे याबाबत चौकशी
गोडसेच्या फलकावर प्रतिक्रिया देताना कर्नाटक युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश इन्ना म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी बोला पंचायतीमधील एका रस्त्याला देशातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसे यांचे नाव देण्यात आले होते. जेव्हा युवक काँग्रेसला हे आढळून आले, तेव्हा आम्ही पंचायत अधिकारी आणि पीडीओकडे याबाबत चौकशी केली. त्यानंतर हे काम सरकारचे नसून कोणत्यातरी अगाऊ व्यक्तीचे असल्याचे समोर आले आहे.