Ujjwal Nikam Rajya Sabha Oath In Marathi: वकील उज्ज्वल निकम यांनी काल राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. १३ जुलै रोजी त्यांची राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून निवड झाली होती. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासह हाय-प्रोफाइल गुन्हेगारी खटले हाताळण्यासाठी प्रसिद्ध असलेले निकम यांनी काल सकाळी ११ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर लगेचच मराठीत शपथ घेतली होती.
कोणाला भावेल म्हणून…
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद सुरू आहे. अशात उज्ज्वल निकम यांना, त्यांनी मराठीतून खासदारकीची शपथ घेतली याबाबत विचारण्यात आले. यावर टीव्ही९ मराठीशी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, “कोणाला भावेल म्हणून मी मराठीत शपथ घेतली नाही. मराठी माझी अस्मिता आहे. मराठी माझी मातृभाषा आहे. दुसरीकडे हिंदी राष्ट्रभाषा असून इंग्रजी आमच्या व्यवहाराची भाषा आहे. त्यामुळे मला कोणत्याही भाषेचे वावडे नाही.”
मला कोणत्याही भाषेबाबत…
ते पुढे बोलताना म्हणाले, “मी ज्या राज्यांमध्ये जातो, तिथल्या लोकांशी त्या भाषेत बोलतो. यामुळे त्या लोकांशी कनेक्टिव्हिटी आणि जवळीक साधता येते. त्यामुळे मला कोणत्याही भाषेबाबत तक्रार नाही. मराठी माझी मातृभाषा आहे आणि याचा मला अभिमान आहे.”
पंतप्रधानांशी मराठीत चर्चा
यापूर्वी, निकम यांनी खुलासा केला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, “लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो तेव्हा त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींनी मला राज्यसभेसाठी नामनिर्देशित केल्याची माहिती देण्यासाठी फोन केला होता. त्यावेळी त्यांनी विचारले की हिंदीत बोलू की मराठीत, यावर आम्ही दोघेही हसलो होतो. त्यानंतर ते माझ्याशी मराठीत बोलले.”
दरम्यान उज्ज्वल निकम यांच्याव्यतिरिक्त, हर्षवर्धन श्रृंगला, मीनाक्षी जैन आणि सदानंदन मास्टर यांनाही राष्ट्रपतींनी राज्यसभेचे खासदार म्हणून नामनिर्देशित केले आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभव
दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उज्जव निकम उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून लढले होते. मात्र, यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसच्या माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी निकम यांचा पराभव केला होता.