Keir Starmer Mumbai Visit: ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान स्टार्मर यांनी ब्रिटन भारतीय नागरिकांना व्हिसा नियमांमधून कोणतीही सूट देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष बाब म्हणजे स्टार्मर हे जुलै महिन्यात स्वाक्षरी करण्यात आलेल्या यूके-भारत मुक्त व्यापार कराराला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई येथे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी यासंबंधी वक्तव्य केले आहे.
मुंबईला येताना विमानात पत्रकारांशी बोलताना स्टार्मर यांनी, भारतीय कामगारांसाठी अधिक व्हिसा खुले करणे हा त्यांच्या सध्याच्या योजनांचा भाग नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी भारतातून कुशल कामगारांना यूकेमध्ये येण्याची परवानगी देण्यासाठी व्यावसायिकांकडून होणार्या मागण्यांना विरोध केला जाईल, असेही सांगितले.
कामगारांच्या तुडवड्याच्या मुद्दा उपस्थित करत ब्रिटिश उद्योजगांकडून चिंता व्यक्त केली जात असताना त्यांच्या पंतप्रधानांचे हे विधान आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, अशी काळजी व्यक्त करणारे अनेक जण हे स्टार्मर यांच्याबरोबर या भारताच्या दौर्यात सहभागी झाले आहेत. कडक इमिग्रेशन धोरण लागू केल्याने महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये कामगारांची कमतरता भासू शकते, अशी भीती या उद्योजकांकडून व्यक्त होते आहे.
स्टार्मर यांच्याबरोबर या दौऱ्यामध्ये १२५ उद्योग आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचे लोक सहभागी झाले आहेत, यापैकी अनेकांनी यूके सरकारला इशारा दिला आहे की, परदेशातून यूकेमध्ये दाखल होणाऱ्या कामगारांवर निर्बंध लादल्यास देशात कामगारांचा तुटवडा निर्माण होण्याचा धोका आहे.
स्टार्मर नेमकं काय म्हणाले?
मात्र स्टार्मर यांनी व्हिसा संबंधी चिंता फारशा गंभीर नसल्याचे सांगत, इमिग्रेशनऐवजी हा करार बिझनेस ते बिझनेस सहभाग, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीवर केंद्रीत असल्यावर भर दिला. “मुक्त व्यापार करारामुळे व्हिसाची स्थिती बदलेली नाही- आम्ही जास्तीचे व्हिसा खुले केलेले नाहीत,” असे स्टार्मर म्हणाले. “व्हिसा ही समस्या नाही- हा करार बिझनेस ते बिझनेस सहभाग आणि गुंतवणूक आणि रोजगार आणि समृद्धी युनायटेड किंग्डममध्ये आणण्याबद्दल आहे,” असेही स्टार्मर यांनी स्पष्ट केले. इमिग्रेशन कमी करण्यासाठी देशांतर्गत दबाव वाढत आहे, या पार्श्वभूमीवर यूकेच्या पंतप्रधानांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
आज मोदींची भेट घेणार
स्टार्मर यांचा भारत दौरा बुधवारपासून सुरू झाला आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ते पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत. स्टार्मर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट होणार असून त्यामध्ये व्यापारासह विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. स्टार्मर यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये त्यांच्याबरोबर १२५ सदस्यांचे शिष्टमंडळही आले आहे. त्यामध्ये ब्रिटनमधील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक, उद्योजक आणि विद्यापीठांचे कुलगुरू यांचा समावेश आहे. रोल्स रॉइस, ब्रिटिश टेलिकॉम, डायजियो, लंडन स्टॉक एक्सचेंज आणि ब्रिटिश एअरवेज यांचे महत्त्वाचे अधिकारी शिष्टमंडळाबरोबर भारतात आले आहेत.