Konstantin Galish Found Dead After Crypto Market Crash: जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजारात शुक्रवारी बिटकॉइन आणि इथेरियमसह विविध क्रिप्टोकरन्सीच्या किमती मोठ्या प्रमाणात कोसळल्या होत्या. यानंतर काल (शनिवारी) ३२ वर्षीय युक्रेनियन क्रिप्टो गुंतवणूकदार कॉन्स्टँटिन गॅलिश युक्रेनमधील कीव येथील ओबोलोन जिल्ह्यात त्यांच्या लॅम्बोर्गिनी कारमध्ये मृतावस्थेत आढळला आहे. याबाबत अनेक स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे. तो सोशल मीडियावर कोस्ट्या कुडो या नावाने लोकप्रिय होता.
कॉन्स्टँटिन गॅलिश याच्या टेलिग्राम चॅनेलने त्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चॅनेलने म्हटले आहे की, मृत्यूचे नेमके कारण काय आहे याचा तपास सुरू आहे. क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांसाठी असलेल्या सोशल प्लॅटफॉर्म बायनान्स स्क्वेअरच्या मते, कॉन्स्टँटिन गॅलिश याने आत्महत्या केली आहे.
विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तात असेही म्हटले आहे की, कॉन्स्टँटिन गॅलिश अनेक क्रिप्टो गुंतवणूकदारांचे फंड व्यवस्थापन करत होता आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत होता. पण, त्याच्याकडून गुंतवणूकदारांच्या ३० लाख डॉलर्सचे नुकसान झाले होते.
कोण होता कॉन्स्टँटिन गॅलिश?
कॉन्स्टँटिन गॅलिश हा केवळ क्रिप्टो गुंतवणूकदार नव्हता, तर ‘क्रिप्टोलॉजी की ट्रेडिंग अकॅडमी’चा सह-संस्थापक आणि सीईओ देखील होता. अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला ९७,००० हून अधिक सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांच्या इंस्टाग्राम पेजला १ लाखाहून अधिक लोक फॉलो करतात.
कॉन्स्टँटिन गॅलिश त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठी ओळखला जात असे. त्याच्याकडे २०२० लॅम्बोर्गिनी उरुस, २०२३ फेरारी २९६ जीटीबी, आणि २०१२ मर्सिडीज-बेंझ २२० सीडीआय यासारख्या अनेक महागड्या गाड्या होत्या.
डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा आणि क्रिप्टो बाजार कोसळला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या महत्त्वाच्या सॉफ्टवेअर्सवर १००% टॅरिफ वाढवण्याची घोषणा केल्यामुळे शुक्रवारी क्रिप्टोकरन्सी बाजार कोसळला, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शुक्रवारी बिटकॉइन, इथेरियम, सोलाना आणि बायनान्स कॉइन सारख्या प्रमुख क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण झाली होती. विश्लेषकांनी स्पष्ट केले की, चिनी गुंतवणूकदार हे क्रिप्टो मार्केटमधील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत आणि अचानक झालेल्या टॅरिफ वाढीमुळे बाजारात नकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत. विश्लेषकांनी असेही नमूद केले की, व्हर्च्युअल असेट मार्केटला नवीन व्यापार नियमांशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागेल.