वृत्तसंस्था, कीव्ह (युक्रेन) : युरोपातील सर्वात मोठय़ा झापोरीझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पाचा बाह्य वीजपुरवठा पाच दिवसांत दुसऱ्यांदा खंडित झाला. या प्रकल्पाला रशियाच्या सैन्याने वेढा घातला असून प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (आयएईए) चिंता व्यक्त केली आहे. गेल्या आठवडय़ात रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर डिझेल ‘जनरेटर’च्या मदतीने सुरक्षा यंत्रणा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे या ‘जनरेटर’ची मदत घेतली जात असून काही दिवस पुरेल एवढाच डिझेलसाठा शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षा यंत्रणांचा वीजपुरवठा खंडित झाला, तर मोठय़ा किरणोत्सर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आयएईएचे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी इशारा दिला आहे. झापोरिझ्झिया प्रकल्पाच्या परिसराचे तातडीने निर्लष्करीकरण करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.

क्रिमिया पूलप्रकरणी ८ जणांना अटक

क्रिमिया पुलावर झालेल्या स्फोटप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती रशियाची अंतर्गत सुरक्षा संस्था, एफएसबीने दिली. यात रशियाचे पाच नागरिक असून तीन युक्रेन आणि अर्मेनियाचे असल्याचे सांगण्यात आले. युक्रेनच्या लष्करी गुप्तहेरांच्या सांगण्यावरून हा स्फोट करण्यात आल्याचा आरोप एफएसबीने केला आहे.

तेलवाहिनीला गळती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रशियातून जर्मनीमध्ये कच्चे तेल वाहून नेणाऱ्या भूमिगत वाहिनीला गळती लागल्याची माहिती पोलंडने दिली आहे. गळतीचे कारण अस्पष्ट असल्याचे वाहिनीचे संचालन करणाऱ्या ‘पर्न’ या कंपनीने म्हटले आहे. दुसरीकडे बाल्टिक समुद्राखालून जाणाऱ्या एका वायुवाहिनीतून अद्याप युरोपला पुरवठा होऊ शकतो. मात्र याचा निर्णय आता युरोपीय महासंघाने घ्यायचा आहे, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले आहे. या प्रकल्पात एकूण चार वायुवाहिन्या असून त्यातील तीन वाहिन्यांना घातपातामुळे गळती लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.