रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे सध्या संपूर्ण जगावर चिंतेचं वातावरण असताना लवकरच हे युद्ध संपण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या लष्करानेच असा दावा केला आहे. युक्रेन लष्कराच्या दाव्यानुसार, ९ मे रोजी रशिया हे युद्ध संपवू इच्छित आहे. Kyiv Independent च्या वृत्तानुसार, युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफच्या गुप्तचर सूत्रांनी दावा केला आहे की, रशियन सैन्याला युद्ध ९ मे पर्यंत संपलं पाहिजे असा आदेश देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

९ मे हा दिवस रशियामधील नाझी जर्मनीवरील विजय म्हणून साजरा केला जातो. दरम्ान रशिया आपल्या हजारो नागरिकांना त्यांच्या देशात घेऊन जात असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. या नागरिकांना ओलीस ठेवत आम्हाला युद्धात माघार घेण्यास भाग पाडण्याचा कट असल्याचाही त्यांचा दावा आहे.

असोसिएट प्रेसच्या वृत्तानुसार, युक्रेनचे लोकपाल डेनिसोवा यांनी चार लाखांहून अधिक नागरिकांना त्यांच्या इच्छेविरोधात रशियात नेण्यात आलं असून त्यामध्ये ८४ हजार लहान मुलं असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे रशियानेही जवळपास हीच संख्या दिली असून या लोकांना रशियाला जायचे होते असा प्रतिदावा केला आहे.

दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पाश्चिमात्य देशांनी नवे निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला असून युक्रेनला माणुसकीच्या आधारावर मदत करण्याचं वचन दिलं. पण युक्रेनच्या राष्टाध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मागितलेल्या मदतीच्या तुलनेत लष्करी सहाय्य कमी मिळत आहे.

“राष्ट्रहित लक्षात घेऊनच रशिया-युक्रेन संघर्षांवर भूमिका”

राष्ट्रहित लक्षात घेऊनच देशाच्या परराष्ट्र धोरणाशी निगडित निर्णय घेतले जातात. रशिया-युक्रेन संघर्षांतील भूमिकाही त्याला अपवाद नाही. कुठल्याही देशाने दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वाचा सन्मान केला पाहिजे. त्यामुळे रशिया-युक्रेन यांनी तातडीने युद्धबंदी करून पूर्ववत शांतता निर्माण केली पाहिजे, असे स्पष्टीकरण केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी राज्यसभेत दिले.

भारत, अमेरिकेसह जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या ‘क्वाड’ गटामध्ये फक्त भारताने रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात संदिग्ध भूमिका घेतली असून त्याचा अमेरिकेशी असलेल्या व्यापारी संबंधावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचा मुद्दा वरिष्ठ सभागृहात उपस्थित केला गेला. त्यावर जयशंकर म्हणाले, ‘‘या युद्धाशी आपला काही संबंध नाही, असे भारताने कधीही म्हटलेले नाही; पण युक्रेन युद्धाचा संबंध भारताचा कोणत्याही देशाशी असलेल्या व्यापारी संबंधांशी जोडू नये!’’ भारताच्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी एक टक्क्यापेक्षा कमी कच्चे तेल रशियातून आयात केले जाते. त्या तुलनेत इराककडून २३ टक्के, सौदी अरेबियाकडून १८ टक्के, संयुक्त अमिरातींकडून ११ टक्के, तर अमेरिकेकडून ७.३ टक्के कच्चे तेल आयात केले जाते.

रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात भारताचे धोरण सहा प्रमुख तत्त्वांवर आधारले असल्याचे जयशंकर म्हणाले. या दोन्ही देशांनी तातडीने युद्धबंदी करावी, अशी मागणी भारताने केलेली आहे. शांतता निर्माण झाली पाहिजे व या दोन्ही देशांनी एकमेकांशी संवाद साधून समस्या सोडवली पाहिजे. तसेच, जागतिक व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करणे महत्त्वाचे असते, असे जयशकंर म्हणाले. कुठल्याही देशातील युद्धजन्य परिस्थितीत मानवतावादी दृष्टिकोनातून तिथल्या लोकांपर्यंत मदत पोहोचवता आली पाहिजे. भारताने आत्तापर्यंत औषधे आदी ९० टन मदत सामग्री पाठवली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या राष्ट्रप्रमुखांशी भारत सातत्याने संपर्कात आहे. दोन्ही देशांमध्ये होत असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दोनदा तर, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी तीन वेळा संवाद साधला असल्याची माहिती जयशंकर यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukrainian army claims russia wants to end war by may 9 sgy
First published on: 25-03-2022 at 09:06 IST