PM Modi-Zelenskyy Phone Call : रशिया आणि युक्रेनमध्ये दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. रशिया सातत्याने युक्रेनच्या विविध शहरांवर हल्ले करत आहे, त्या हल्ल्याला युक्रेन जशास तसं प्रत्युत्तर देत आहे. या युद्धाचे परिणाम अनेक देशांवर देखील होत आहेत. खरं तर रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मध्यस्थी करत आहेत. मात्र, त्यांना हा संघर्ष थांबवण्यास अद्याप यश आलेलं नाही. यातच आता डोनाल्ड ट्रम्प हे स्वत: व्लादिमीर पुतिन यांची १५ ऑगस्ट २०२५ रोजी भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीत कोणता निर्णय होतो? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट होण्यापूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आज (११ ऑगस्ट) पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी झेलेन्स्की आणि पंतप्रधान मोदी यांच्यात रशिया-युक्रेनमधील संघर्ष आणि संभाव्य शांतता प्रयत्नासाठी व भारत आणि युक्रेनमधील द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती सांगण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी काय म्हटलं?

“भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी माझी दीर्घ चर्चा झाली. आम्ही सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. आमचे द्विपक्षीय सहकार्य आणि एकूण राजनैतिक परिस्थिती यावर चर्चा झाली. आमच्या लोकांना पाठिंबा देण्याच्या त्यांच्या भूमिकेबाबत मी त्यांचा आभारी आहे. तसेच मी आमच्या शहरांवर रशियन हल्ल्यांबद्दल, झापोरिझ्झिया येथील बस स्थानकावर झालेल्या हल्ल्याबद्दल त्यांना माहिती दिली”, असं झेलेन्स्कींनी म्हटलं आहे.

“रशियाने नियमित शहरी सुविधांवर जाणूनबुजून केलेल्या बॉम्बस्फोटात डझनभर लोक जखमी झाले होते. हे अशा वेळी होत आहे, जेव्हा युद्ध संपवण्याची राजनैतिक शक्यता आहे. युद्धबंदीची तयारी दाखवण्याऐवजी रशिया केवळ कब्जा आणि हत्या सुरू ठेवण्याची इच्छा दाखवत आहे”, असं झेलेन्स्की यांनी म्हटलं. तसेच आम्ही सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान वैयक्तिक बैठकीचे नियोजन आणि भेटींच्या देवाणघेवाणीवर चर्चा करण्याचं मान्य केल्याचंही झेलेन्स्की यांनी म्हटलं.

पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या संवादाची माहिती पंतप्रधान मोदींनी एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. मोदींनी म्हटलं की, “झेलेन्स्की यांच्याशी बोलून आणि अलीकडील घडामोडींबद्दल त्यांची भूमिका ऐकून आनंद झाला. संघर्षाच्या लवकर आणि शांततापूर्ण निराकरणाबद्दल भारताची सातत्यपूर्ण भूमिका व्यक्त केली. भारत या संदर्भात शक्य तितके सर्व योगदान देण्यास तसेच युक्रेनबरोबर द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे.”

डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट होणार?

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून संघर्ष सुरू आहे. रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मध्यस्थी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता पुतिन आणि ट्रम्प यांची १५ ऑगस्ट २०२५ रोजी भेट होणार आहे. या भेटीत रशिया-युक्रेन युद्धबंदीसाठी तोडगा काढण्याच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. पुतिन आणि ट्रम्प यां ही भेट अलास्कामध्ये होणार आहे.