Pakistan in UN Security Council Meeting: पहलगाम दहशतवादी हल्ला व त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कमालीचे ताणले गेलेले संबंध या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांदरम्यान युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. हल्ल्यात पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यानंतरदेखील पाकिस्तानकडून मात्र संबंध नसल्याचाच कांगावा केला जात आहे. तसेच, पाकिस्तानचे पंतप्रधान, लष्कर प्रमुख यांच्याकडून भडकाऊ विधानं केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरस यांनी यासंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे.

पाकिस्तानची UN मध्ये धाव आणि सुरक्षा परिषदेची बैठक

पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचं भारतानं स्पष्ट केल्यानंतर पाकिस्तान पिछाडीवर पडला असून आपल्या बचावासाठी पाकिस्ताननं थेट संयुक्त राष्ट्राचे दरवाजे ठोठावले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तान अस्थायी सदस्य असून भारताच्या कारवाईसंदर्भात चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली जावी, अशी विनंती पाकिस्तानने केली होती. त्यानुसार भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी सकाळी ही बैठक बोलावण्यात आली आहे.

बंद दाराआड झालेल्या या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते? यासंदर्भातली कोणतीही माहिती संयुक्त राष्ट्राकडून जाहीर केली जात नाही. भारत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये पूर्णवेळ किंवा अस्थायी सदस्य नसल्यामुळे या बैठकीसाठी भारताचे प्रतिनिधी उपस्थित नसतात. त्यामुळे इतर सदस्य राष्ट्रांकडूनच भारताला या बैठकीतील चर्चेसंदर्भातील माहिती मिळू शकेल.

संयुक्त राष्ट्र प्रमुखांचं सूचक विधान

दरम्यान, या बैठकीचा तपशील जाहीर केला जात नसला, तरी संयुक्त राष्ट्रप्रमुखांनी बैठकीआधी दिलेल्या प्रतिक्रियेवरून चर्चेसंदर्भात अंदाज लावले जात आहेत. “सध्याच्या अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत कोणत्याही प्रकारे लष्कराचा वापर झाल्यास परिस्थिती वेगाने नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे या स्थितीत लष्कराचा वापर टाळणंच योग्य ठरेल”, असं गुटेरस म्हणाले आहेत.

“युद्धाच्या काठावर स्थिती पोहोचलेली असताना तिथून मागे सरकणं आणि आक्रमकतेला अधिकाधिक आळा घालणं आवश्यक आहे. भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांशी झालेल्या चर्चेदरम्यान मी हाच संदेश दिला आहे. युद्धाचा पर्याय हा योग्य पर्याय ठरणार नाही यात अजिबात शंका नाही”, असंही गुटेरस यांनी नमूद केलं.

पहलगाम हल्ल्याचा केला निषेध

दरम्यान, अँटोनियो गुटेरस यांनी यावेळी बोलताना पहलगाम हल्ल्याचा जाहीर निषेध केला. “मी पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्याचा जाहीर निषेध करतो आणि हल्ल्यातील पीडितांबाबत माझ्या संवेदना व्यक्त करतो. सामान्य नागरिकांना लक्ष्य करणं हे अजिबात स्वीकारार्ह नाही. जे यासाठी जबाबदार आहेत, त्यांना कायद्यानुसार योग्य ती शिक्षा व्हायलाच हवी. या हल्ल्यानंतर भारतीयांच्या मनातील संताप मी समजू शकतो”, असं गुटेरस म्हणाले.

UNSC ची रचना

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये पाच पूर्णवेळ सदस्य राष्ट्रे आहेत. त्यात चीन, फ्रान्स, रशिया, यूके आणि अमेरिका या राष्ट्रांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त सध्या या परिषदेमध्ये १० अस्थायी सदस्यांचाही समावेश आहे. त्यात अल्गेरिया, डेन्मार्क, ग्रीस, गयाना, पाकिस्तान, पनामा, दक्षिण कोरिया, सिएरा लिओने, स्लोव्हानिया आणि सोमालिया या राष्ट्रांचा समावेश आहे. ज्याप्रकारे २०१९ मध्ये भारत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत अर्धवेळ सदस्य होता, त्याचप्रमाणे सध्या पाकिस्तान या परिषदेत अस्थायी सदस्य आहे. त्यामुळे पाकिस्तानला परिषदेच्या बैठकीत आपली भूमिका मांडण्याचा अधिकार असेल.