१ फेब्रुवारी रोजी अर्थ मंत्री अरुण जेटली हे अर्थ संकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सेवा कर वाढवून १६ ते १८ टक्के केला जाईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या सेवा कर १५ टक्के आहे. तो वाढवला जाणार आहे. वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) लागू होण्यासाठी अद्याप वेळ आहे. त्या पार्श्वभूमीवर या कायद्याची ‘पूर्वतयारी’ म्हणून सेवा करात वाढ केली जाईल असे अंदाज तज्ज्ञांनी लावला आहे. जीएसटी हा १८ टक्के आहे. त्यामुळे जीएसटीच्या जवळ कर नेण्यात येऊ शकतो.

सेवा करात वाढ झाल्यास विमानाने प्रवास करणे, बाहेर फिरणे, हॉटेलात खाणे, फोन बिल आणि इतर सेवा महागणार आहेत. १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू केला केला जाणार आहे. या कायद्यामुळे उत्पादन शुल्क, सेवा कर, मूल्यवर्धित कर हे सर्व कर एकाच छत्राखाली येतील.

जीएसटीमध्ये कराचे स्तर ५, १२, १८ आणि २८ टक्के असे आहेत. या अर्थसंकल्पामध्ये सेवा कर हा एका स्तराच्या जवळ नेला जाईल. हे अतिशय तर्कसंगत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. मागील अर्थसंकल्पात जेटली यांनी सेवा कर ०.५ टक्क्यांनी वाढवला होता. या अर्थसंकल्पात ते १ टक्क्याने कर वाढवतील असा एक अंदाज आहे. तसेच काही तज्ज्ञांना असे वाटते की प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळा सेवा कर आकारला जाईल. १२ टक्के ते १८ टक्क्यांदरम्यान हा कर आकारला जाऊ शकतो असे ते म्हणाले. तसेच एप्रिल ते जून या काळासाठी जास्त सेवा कर लावले जातील.