देशभरात करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने पुन्हा एकदा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून चाचणी वाढवण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी लिहिलेल्या पत्रात अनेक सूचना देण्यात आल्या आहेत. देशाच्या विविध भागांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढण्याबरोबरच कोविड-१९ च्या रुग्णसंख्येमध्येही वाढ होत आहे. करोनाचे नवीन प्रकार रोखण्यासाठी संशयित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कांची लवकरात लवकर तपासणी करणे हा मुख्य उपाय आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

देशात करोनाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता केंद्राने सर्व राज्य सरकारांना विविध ठिकाणी कोरोना चाचणीसाठी २४ तास बूथ उभारण्याचा सल्ला दिला आहे. केंद्राने राज्यांना या बूथवर कोविड-१९ साठी २४ तास जलद अँटीजन टेस्ट सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. तसेच आरोग्य कर्मचार्‍यांना लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी स्वदेशी बनावटीच्या चाचणी किट वापरण्यास प्रोत्साहित केले आहे.

करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. धोका लक्षात घेता सरकारने आठ राज्यांना पत्र लिहून सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंड यांना पत्र लिहून त्यांना करोना चाचणी वाढवावी आणि रुग्णालय स्तरावरील तयारी मजबूत करावी, लसीकरणाला गती द्यावी आणि व्याप्ती वाढवावी असा सल्ला दिला आहे.

करोनाच्या रुग्णांमध्ये अचानक झालेली वाढ पाहता केंद्राने या राज्यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. मृत्यूदर वाढू नये यासाठी केंद्राने कठोर पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. केंद्राने या राज्यांना सांगितले की, दिल्लीत लागू करण्यात आलेले जीआरएपी मॉडेल संपूर्ण देशात नेण्याचा विचार केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल अँड रिसर्च (आयसीएमआर) चे महासंचालक डॉ बलराम भार्गव म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीला ताप, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास, शरीरात वेदना, चव किंवा वास कमी होणे, थकवा आणि जुलाब होत असल्यास त्याला कोविड-१९ चे संशयित रुग्ण मानले पाहिजे.

“अशा सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात यावी. तपासाचा अहवाल येईपर्यंत, अशा लोकांनी ताबडतोब स्वत:ला वेगळे करावे आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने होम आयसोलेशनशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात यावे,” असे डॉ बलराम भार्गव यांनी म्हटले आहे.