Amit Shah Speech in Parliament Monsoon Session: पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून घेण्यात आला असल्याचे सरकारने सांगितले आहे. पहलगाम येथील हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना भारतीय सैन्यांनी ठार केले. ऑपरेशन सिंदूर आणि महादेव यांची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत दिली. तसेच सोमवारपासूनच्या चर्चेत विरोधकांनी केलेल्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले.
काँग्रेसचे लोकसभेतील उप गटनेते गौरव गोगोई यांनी सोमवारी आपल्या भाषणात केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. उरी, पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने कारवाई केली होती. त्यानंतर पाकिस्तान पुन्हा कुरापत करण्याचे धाडस करणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. तरीही पाकिस्तानने पहलगाम येथे हल्ला करण्याचे धाडस कसे केले? असा सवाल गोगोई यांनी उपस्थित केला होता.
विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी १९४८ पासूनचा इतिहास सांगितला. तसेच सीमेवर भारतीय जवान अतिशय बिकट भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणात आपले कर्तव्य बजावत असतात, याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, गोगोई अनेकदा पाकिस्तानला जात असतात. पण त्यांनी एकदा पाकिस्तानच्या सीमेवर नक्की जावे. तिथे गेल्यावर त्यांना आपल्या जवानांची अडचण दिसेल. उणे ४० अंश सेल्सियस वातावरणात जवान पहारा देत असतात.
काही जण घुसले म्हणून काय झालं?
केंद्रीय अमित शाह पुढे म्हणाले, सीमेवर नदीच्या पात्रात, डोंगर दऱ्यात जवान पहारा देतात. अशावेळी कुणी घुसले तर काय झाले? जर कुणी सीमेतून घुसले असेल तर तो वाचणार नाही. त्याला आम्ही अटक करू किंवा चकमकीत तो मारला जाईल. पण विरोधकांना सीमेवरील भौगोलिक संकटे माहीत नाहीत. तिथे जाऊन एकदा तापमान पाहा. त्यातही पाकिस्तानच्या वतीने जमिनीखालून सुरूंग खोदले जातात.
तुमच्यावेळी तर व्हिसा घेऊन आत येत होते – अमित शाह
दहशतवादी घुसले, घुसले.. अशी बोंब विरोधक ठोकत असले तरी त्यांच्यावेळी तर त्यांना घुसावे लागतच नव्हते. कारण विरोधकांचे सरकार असताना त्यांना व्हिसा देऊन बोलवले जात असे. मग त्यांना घुसण्याची गरजच पडत नव्हती. तुम्ही जसे पाकिस्तानात जात होता, तसे ते भारतात येत होते, अशी खोचक टीका अमित शाह यांनी केली.