पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी कुचबिहार येथे हा हल्ला झाल्याचे म्हटले जात असून तृणमूल काँग्रेस समर्थित गुंडांनी हा हल्ला केल्याचा दावा भाजपाकडूनक केला जात आहे.

हेही वाचा >> औरंगाबादच्या नामांतरावर रोहित पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “बेरोजगारी, शेतकरी…”

मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृह, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक हे कुचबिहार येथील दिंहाता येथे भाजपाचे नेते आणि कार्यकत्यांची भेट घेण्यासाठी जात होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर अज्ञात लोकांनी दगडफेक केली. या घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यंनी प्रामाणिक यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा दावा केला जात आहे. तसेच त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे देखील दाखवण्यात आले.

पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर

केंद्रीय मंत्री प्रामाणिक यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. येथे तृणमूल काँग्रेस तसेच भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. वाद चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी येथे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केल्याचे दिसत आहे. भाजपाचे कार्यकर्ते ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या बाजुला पोलीस तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा >> सोनिया गांधी निवृत्त होणार? रायपूरच्या अधिवेशनात केले सूचक विधान; म्हणाल्या “माझ्या प्रवासाचा समारोप…”

भाजपा, तृणमूलकडून आरोप प्रत्यारोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या घटनेनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. पश्चिम बंगालमध्ये एका केंद्रीय मंत्र्यावर अशा प्रकारे हल्ला होत असेल, तर येथे सामान्य माणसाची काय स्थिती असेल, असा सवाल भाजपाने उपस्थित केला आहे. तर भाजपाचे दिलीप घोष आणि सुवेंदू अधिकारी यासारखे नेते पश्चिम बंगालमध्ये अशांतता निर्माण व्हावी यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांना भडकवत आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते जयप्रकाश मुजूमदार यांनी केला आहे.