scorecardresearch

प्रदूषणविरहित वाहनासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संसदेच्या आवारात

संसदेत आणि संसदेच्या बाहेर इंधनदरवाढीची चर्चा होत असताना, केंद्रीय भूपृष्ठ विकासमंत्री नितीन गडकरी बुधवारी पेट्रोल वा जीएनजी नव्हे तर, प्रदूषणविरहित हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या कारमधून संसदेत पोहोचले.

नवी दिल्ली : संसदेत आणि संसदेच्या बाहेर इंधनदरवाढीची चर्चा होत असताना, केंद्रीय भूपृष्ठ विकासमंत्री नितीन गडकरी बुधवारी पेट्रोल वा जीएनजी नव्हे तर, प्रदूषणविरहित हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या कारमधून संसदेत पोहोचले.

ग्रीन हायड्रोजनवरील कारचा इंधनावरील खर्च पारंपरिक इंधनाच्या खर्चापेक्षा कित्येक पटीने कमी असल्याने आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असा मुद्दा गडकरी अलिकडच्या काळात सातत्याने मांडत आहेत. ग्रीन हायड्रोजन इंधनावरील कार बाजारात आली असून त्यानिमित्ताने गेल्या महिन्यात गडकरी यांच्या निवासस्थानी कारनिर्मिती करणाऱ्या टोयोटो कंपनीचा कार्यक्रमही आयोजित केला होता. ‘हायड्रोजन इंधनावरील या कारकडे प्रयोग म्हणून पाहिले पाहिजे. पेट्रोल व डिझेलवर चालणारी कार वा अन्य वाहने मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण निर्माण करतात. शिवाय, इंधनही आयात करावे लागते. ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या गाडय़ांसाठी इंधन आयात करावे लागणार नाही. देशाच्या परकीय चलनात मोठी बचत होईल’, असे गडकरी म्हणाले. ग्रीन हायड्रोजनवरील कार ही ऑक्सिजनची प्रक्रिया होऊन वीज निर्माण होते. त्यातून निर्माण होणाऱ्या उर्जेच्या आधारे ही कार धावते. या कारमधून धूर नव्हे तर वाफ उत्सर्जित होते. ‘आता देशात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कार बनवल्या जातील. त्याचा देशाला आर्थिकदृष्टीने तसेच, पर्यावरणाच्या दृष्टीनेही लाभ होईल’, असेही गडकरी म्हणाले.

‘मिराई’

हायड्रोजन कारमध्ये इंधन भरणे अत्यंत सोपे असून २-३ मिनिटांमध्ये हायड्रोजन इंधन भरता येते. कारच्या प्रेशर टॅंकमध्ये हायड्रोजन साठवून ठेवता येतो. गडकरींनी संसदेत आणलेली ही कार टोयोटो ‘मिराई’ नावाने ओळखली जाते. ‘मिराई’ हा मूळ जपानी शब्द असून ‘भविष्य’ असा त्याचा अर्थ असून भारताला इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवणारे हे तंत्रज्ञान असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

चरित्र अभिनेत्याला हिरो बनता येत नाही!

चरित्र अभिनेता वा चरित्र अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली की पुन्हा हिरो वा हिरोईन बनता येत नाहीत तसेच, वाहनांच्या तंत्रज्ञानाचे असते. जुन्या तंत्रज्ञान वापरलेल्या गाडय़ा वापरता येत नाहीत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बनवलेल्या कार वापराव्या लागतात, अशी मिश्किल टिप्पणी गडकरी यांनी  राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Union minister nitin gadkari parliament premises pollution free vehicle increased fuel prices discussion ysh

ताज्या बातम्या