Aligarh Mother-In-Law Love Story: प्रेमाला वय नसते, कोणत्याही सीमा नसतात, असे म्हटले जाते. उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये हे वाक्य सत्यात उतरले. सासूचा होणाऱ्या जावयावर जीव जडला आणि मग दोघांनीही एकमेकांसह घरातून पळ काढला. ज्या मुलीचे हात मेहंदीने रंगले होते, त्या मुलीच्या जागी आता तिची आईच नवऱ्यामुलाची घरी जात आहे. अलीगढच्या प्रकरणावर गेल्या काही दिवसांपासून खमंग चर्चा रंगली. आता या प्रकरणात अखेर मार्ग निघाला असून सासू सपना देवी आणि जावई राहुल यांनी एकमेकांबरोबर पुढील आयुष्य घालविण्याचा निर्णय घेतला आहे.
राहुल आणि शिवानी यांचे १६ एप्रिल रोजी लग्न होणार होते. लग्नपत्रिका छापून झाल्या होत्या. लग्नाची सर्व तयारी झाली होती. पण ८ एप्रिल रोजी अचानक राहुल शिवानीची आई सपना देवीबरोबर पळाला. शिवानीच्या लग्नासाठी तिचे वडील जितेंद्र कुमार यांनी पाच लाखांचे दागिने आणि तीन लाखांची रोकड जमा केली होती. हा सर्व मुद्देमाल घेऊन सपना देवी फरार झाल्या होत्या.
जितेंद्र कुमार यांनी पत्नी सपना देवी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविल्यानंतर आणि राहुलचाही फोन बंद असल्याचे समजल्यानंतर सदर प्रकरण उजेडात आले. १६ एप्रिल रोजी सपना देवी आणि राहुल दोघेही अलीगढमध्ये पुन्हा परतले. त्यानंतर त्यांची पोलीस ठाण्यात रवानगी झाली.
पोलिसांनी दोघांचेही १२ तास समुपदेशन केले. सपना देवी आणि राहुलने एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे दोघांची समजूत काढण्यात आली. मात्र दोघेही आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सपना देवी यांनी आपला नवरा आणि कुटुंबियांनाही त्यांचा निर्णय ठामपणे सांगितला. पोलीस ठाण्यात आलेल्या सात वर्षांच्या आपल्या मुलाकडे त्यांनी पाहिलेही नाही. तर शिवानी आणि पती जितेंद्र कुमार यांच्या सततच्या जाचाला कंटाळून आपण हा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर राहुलचे म्हणणे आहे की, त्याने सपना देवी यांचे आयुष्य वाचवले. तोही यापुढे सपना देवी यांच्याबरोबरच राहू इच्छितो. दोघेही लवकरच नोंदणी पद्धतीने विवाह करणार आहेत. दरम्यान राहुलच्या घरच्यांनी त्याच्याशी सर्व संबंध तोडले आहेत.
मुलीची आईवर कठोर टीका
दरम्यान सपना देवी यांच्या मुलीला मात्र मोठा धक्का बसला आहे. ज्याच्याबरोबर भावी आयुष्याची स्वप्न पाहिली तोच आता आपल्या आईचा नवरा होणार असल्याची कल्पना तिला सहन होत नाही. यातच तिने पोलीस ठाण्यात असलेल्या आईला बोल लावले. पती जितेंद्र कुमार यांनी माफी मागत सपना देवींना घरी येण्याचे आर्जव केले. गावातील महिलांनीही त्यांची समजूत काढली. पण सपना देवी आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या.