Pakistani Spy Arrested In UP: उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली वाराणसी येथून तुफैल नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर भारताच्या अंतर्गत सुरक्षेबद्दलची संवेदनशील माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने एका निवेदनात म्हटले आहे की, “तुफैलने व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटना तहरीक-ए-लब्बैकचा नेता मौलाना शाह रिझवी याचे व्हिडिओ शेअर केले होते. ज्यामध्ये ‘गजवा-ए-हिंद’, बाबरी मशीद पाडल्याचा बदला घेण्याचे आणि भारतात शरिया कायदा लागू करण्याचे आवाहन करण्यात आले होते.”
दहशवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासादरम्यान असे आढळून आले की तुफैल कथितपणे राजघाट, नमो घाट, ज्ञानवापी, रेल्वे स्टेशन आणि लाल किल्ला यासारख्या संवेदनशील ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांना पाठवत होता.
पाकिस्तानी जवानाच्या पत्नीशी संपर्क
निवेदनात असेही म्हटले आहे की, “तुफैलने पाकिस्तानद्वारे चालवल्या जाणाऱ्या व्हॉट्सअॅप ग्रुप्सची लिंक वाराणसीतील इतर अनेक लोकांना पाठवली होती. याद्वारे पाकिस्तानी अधिकारी आणि स्थानिकांमध्ये संपर्क साधला जायचा. तो ६०० हून अधिक पाकिस्तानी क्रमांकांवर संपर्कात होता. तुफैल फेसबुकद्वारे पाकिस्तानातील फैसलाबाद येथील रहिवासी नफीसा नावाच्या महिलेशी संपर्कात होता, जिचा पती पाकिस्तानी सैन्यात आहे.”
दरम्यान गेल्या रविवारी, उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करण्याचा आणि सीमेपलीकडून अनेक वस्तूंची तस्करी करण्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला अटक केली होती.
भारत-पाकिस्तान सीमेवर एक व्यक्ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या मदतीने तस्करीच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती देणाऱ्याने असाही आरोप केला की, तो पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस साठी हेरगिरी करत होता आणि देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होता. याबाबत हिंदुस्तान टाइम्सने वृत्त दिले आहे.
यापूर्वी सहा जणांना अटक
भारत-पाकिस्तान यांच्या तणाव निर्माण झाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली एकूण ६ लोकांना अटक केली आहे. यामध्ये ट्रॅव्हल युट्यूबर ज्योती मल्होत्राचे नाव आघाडीवर आहे. हिसारची रहिवासी असलेल्या ज्योतीने काही पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे.