नवी दिल्ली : स्वतंत्र प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून माध्यमांची ही महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन आपले सरकार वागेल, असे आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी दिले. ‘दि इंडियन एक्स्प्रेस’च्या संस्थापकांचे नाव देण्यात आलेल्या नॉयडा सेक्टर १०मधील ’रामनाथ गोएंका मार्ग’ या २.२ किलोमीटर रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
इंडियन एक्स्प्रेसचे कार्यालय असलेल्या या रस्त्याच्या नामकरणप्रसंगी आदित्यनाथ म्हणाले, की लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे अनेक अर्थानी हा महत्त्वाचा दिवस आहे. भाषणस्वातंत्र्य आणि माध्यमस्वातंत्र्याचे रक्षण करण्याकरिता, देशाच्या इतिहासातील ‘काळा अध्याय’ असलेल्या आणीबाणीला विरोध करण्यात रामनाथ गोएंका यांनी बजावलेल्या भूमिकेचा आदित्यनाथ यांनी आवर्जून उल्लेख केला. ‘भावनिकदृष्टय़ा, तसेच लोकशाहीच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातूनही हा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. हा निव्वळ योगायोग आहे असे मला वाटत नाही. या स्मारकाला २५ जून रोजी रामनाथ गोएंकाजी यांचे नाव देण्यात येणे ही दैवी प्रेरणा आहे. ते अशी व्यक्ती होते, ज्यांनी केवळ माध्यमांचे स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यातच नव्हे, तर ४८ वर्षांपूर्वी धोक्यात असलेल्या लोकशाहीचे रक्षण करण्यातही महत्त्वाचे योगदान दिले,’ असे आदित्यनाथ यांनी नमूद केले.
‘उत्तर प्रदेशची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॉयडामध्ये रामनाथ गोएंकाजी यांचे नाव दिलेल्या या रस्त्याचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. मी रामनाथ गोएंकाजी यांना आणि ज्यांनी लोकशाचे रक्षण करण्यासाठी प्राणांचे बलिदान दिले अशा लोकशाहीच्या सर्व सैनिकांना श्रद्धांजली वाहतो’, असे भावपूर्ण उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. रामनाथ गोएंका यांचे वर्णन माध्यमांचा ‘ध्रुव तारा’ असे करून योगी म्हणाले की, ज्या-ज्या वेळी आपण लोकशाही आणि माध्यमस्वातंत्र्य याबद्दल बोलू, तेव्हा त्यांचे नाव श्रद्धा आणि आदराने घेतले जाईल. महात्मा गांधींपासून प्रेरणा घेऊन रामनाथजींनी १९३२ साली ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ची स्थापना केली, याचा आवर्जून उल्लेखही योगी आदित्यनाथ यांनी केला.