उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात केलेलं विधान सध्या चर्चेत आलं आहे. सोमवारी एका जाहीर सभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल आणि ऑल इंडिया मुस्लीम लीगचे प्रमुख मोहम्मद अली जिना यांचा उल्लेख केला. वंदे मातरम गाण्यावरून चालू असलेल्या वादासंदर्भात आदित्यनाथ यांनी गाणं गाण्यास नकार देणाऱ्यांना थेट मोहम्मद अली जिना यांची उपमा दिली आहे. भारतात आपण दुसरे जिना जन्माला येऊ देऊ शकत नाही, असं विधान आदित्यनाथ यांनी केलं आहे. तसेच, वंदे मातरम उत्तर प्रदेशमधील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये गायलं जायला हवं, असं ते म्हणाले.
काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
वंदे मातरम गाण्यास नकार देणे हा नव्या जिनांना जन्माला घालण्याच्या कटाचा भाग असल्याची टीका आदित्यनाथ यांनी केली. “हा नवीन जिना जन्माला घालण्याच्या कटाचा भाग आहे. आता तसं काही होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. जर तशी हिंमत कुणी केली तर त्यानं भारताच्या अखंडतेला आव्हान देण्याआधीच त्याला गाडून टाकायला हवं”, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. रविवारी समाजवादी पक्षाचे संभलमधील खासदार झिया-उर-रेहमान बर्क यांनी वंदे मातरम गाण्यास नकार दिल्याच्या संदर्भात योगी आदित्यनाथ बोलत होते.
देशाच्या एकतेसमोर तुमच्या श्रद्धा दुय्यम – आदित्यनाथ
या वादावर योगी आदित्यनाथ म्हणाले, “आपल्या धार्मिक श्रद्धा एका बाजूला, पण जर त्या देशाच्या एकता आणि सौहार्दाच्या आड येत असतील, तर त्यांना बाजूला ठेवलं जायला हवं. कोणतीही व्यक्ती, जात किंवा धर्म हा देशापेक्षा मोठा नाही”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. “आपण हे लक्षात ठेवायला हवं की आपला प्रत्येक स्वातंत्र्यसैनिक वंदे मातरम गाणं म्हणूनच स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरला. हे गाणंच आपल्या स्वातंत्र्याचा मंत्र झालं. आता काही लोक या गाण्याला सांप्रदायिकतेचं लेबल लावू पाहात आहेत”, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी टीका केली.
प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये वंदे मातरम्!
दरम्यान, गोरखपूरमध्येच एका कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येक शाळा व महाविद्यालयात वंदे मातरम् गाण्याचं सामुहिक गायन व्हावं, असं आवाहन केलं. देशाच्या एकात्मतेला कमकुवत करणाऱ्या शक्तींना आपण रोखायला हवं, जेणेकरून कुणीही दुसरा जिना जन्म घेऊ शकणार नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
सपा खासदार झिया-उर-रेहमान बर्क नेमकं काय म्हणाले?
आपण वंदे मातरम् हे गाणं कधीही गायलो नाही आणि त्यावरून आपल्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकत नाही, असं बर्क म्हणाले. “माझे आजोबा बर्क यांनी नेहमीच हे सांगितलं आणि त्यांनी स्वत:देखील हे गाणं कधी गायलं नाही. मीही हे गाणं गात नाही. पण या गोष्टीवरून माझ्या देशभक्तीवर कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. या गाण्यातील काही शब्द हे मुस्लिमांच्या धर्मातील शिकवणीच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे हे गाणं गाण्याची कुणीही मुस्लिमांवर सक्ती करू शकत नाही”, असं बर्क म्हणाले.
