उत्तर प्रदेश निवडणुकीआधी RSS कडून महत्त्वाचा बदल; कुमार यांच्याकडे संघ-भाजपा समन्वयाची जबाबदारी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महत्त्वाचा बदल… संपर्क अधिकारी म्हणून सोपवली जबाबदारी…

RSS, RSS BJP link, Arun Kumar, Arun Kumar RSS pointsperson, RSS BJP pointsperson, Krishna Gopal, RSS ideology
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महत्त्वाचा बदल… संपर्क अधिकारी म्हणून सोपवली जबाबदारी… (संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. चित्रकूटमध्ये झालेल्या अखिल भारतीय प्रांत प्रचार बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, भाजपा आणि RSS यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी अरुण कुमार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संघाचे सह-सहकार्यवाह असलेले अरुण कुमार यांच्यावर संपर्क अधिकारी म्हणून नवी जबाबदारी टाकण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. भाजपाने या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं असून, अनेक महत्त्वाचे बदल केले जाताना दिसत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातही हे दिसून आलं. तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन भाजपा-संघ समन्वयासाठी महत्त्वाचा बदल केला आहे. संघांची उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथे अखिल भारतीय प्रांत प्रचार बैठक झाली. या बैठकीत संपर्क अधिकारी म्हणून अरूण कुमार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अरुण कुमार हे सह-सरकार्यवाह आहेत. भाजपा आणि संघात समन्वय ठेवण्याचं काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. यापूर्वी कृष्ण गोपाल यांच्याकडे हे काम होतं. मात्र, प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा बदल मानला जात आहे. चित्रकूटमध्ये सुरू असलेल्या या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह दत्तात्रय होसबळे आणि संघाचे इतर महत्त्वाचे पदाधिकारी सहभागी झालेले आहेत. दरवर्षी ही बैठक बोलावण्यात येते. यावेळी मात्र, उत्तर विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा केली जाणार असल्याचं वृत्त आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पश्चिम बंगालमध्येही बदल केले आहेत. बंगालमधील प्रांत प्रचारक आणि प्रदेश प्रभारी या पदावर खांदेपालट करण्यात आली आहे. मार्च-एप्रिलमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Up election rss arun kumar sampark adhikari coordinate between rss and bjp bmh