अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वामुळे उत्तर प्रदेशला मोठा फायदा होणार असून राज्याची प्रगती होईल, असे मत रॉबर्ट वडेरा यांनी व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने युती केली होती. ही युती घडवून आणण्यात रॉबर्ट वडेरा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या पार्श्वभूमीवर रॉबर्ट वडेरा यांनी सोमवारी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून उत्तर प्रदेशमधील सध्याच्या परिस्थितीविषयी भाष्य केले. यावेळी रॉबर्ट यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख ब्रँड आयकॉन असा केला. काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील युती ही केवळ दोन राजकीय पक्षांतील युती नाही. अखिलेश यादव आणि राहुल गांधी या दोन प्रभावशाली नेत्यांचे एकत्र येण्याच्या दृष्टीकोनातून याकडे बघितले पाहिजे, असे रॉबर्ट वडेरा यांनी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीसाठी मी या दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देतो. मला आशा आहे की, त्यांच्या प्रभावशाली नेतृत्त्वाखाली उत्तर प्रदेशला नवी झळाळी प्राप्त होईल आणि राज्याची खूप प्रगती होईल. तरूणांचे प्रेरणास्थान असलेले हे दोन्ही नेते अफाट उर्जा आणि नव्या कल्पनांच्या माध्यमातून उत्तर प्रदेशचा जागतिक दर्जाच्या राज्यात कायापालट करतील, असे वडेरा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि सपाची युती करण्यामध्ये प्रियांका गांधी यांनी महत्त्वाची भूमिका पार पडल्यानंतर प्रियांका राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा रंगली आहे. काही नेत्यांच्या मते प्रियंका यांनी ज्यापद्धतीने उत्तर प्रदेशमधील परिस्थिती सांभाळली यावरून त्या २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा बनू शकतात. सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून त्या निवडणूक लढवू शकतात, असे मानले जात आहे. प्रियंका गांधींमुळेच समाजवादी पक्षाबरोबर आघाडी झाल्याचे सोमवारी (दि. २३) काँग्रेसने अधिकृतरित्या म्हटले होते. आतापर्यंत काँग्रेसचे नेते प्रियंका यांच्या सक्रिय राजकरणात येण्यावरून चर्चा करण्यास टाळत होते. परंतु उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्तरावरील राजकारणात त्यांना येण्याची मागणी सातत्याने होत आली आहे.

सोनिया गांधी यांनी आपली पहिली निवडणूक १९९९ मध्ये अमेठीतून लढली होती. त्यानंतर २००४ मध्ये त्या रायबरेली मतदारसंघात गेल्या व अमेठी मतदारसंघ राहुल गांधी यांना देण्यात आला. हे दोन्ही मतदारसंघ गांधी कुटुंबीयांचा गड मानला जातो. आई सोनिया गांधी व भाऊ राहुल यांच्या निवडणुकीची धुरा प्रियंका आपल्याच हाती घेत असतात. प्रियंका या रायबरेलीतूनच आपली राजकीय कारकीर्द सुरू करण्याची शक्यता आहे. इंदिरा गांधीही याच मतदारसंघातून निवडणूक लढत होत्या. प्रियंका यांची नेहमी इंदिरा गांधींशी तुलना केली जाते.
काँग्रेसमध्ये वरिष्ठ स्तरावर अनेक बदल होतील, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. येत्या काही दिवसांत राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्षपद बहाल केली जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी सोनिया गांधींच्या अनुपस्थितीत त्यांनी बैठकीचे नेतृत्व केले होते. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी तयारीसाठी दोन वर्ष मिळावा यासाठी नवी टीम तयार केली जाईल. प्रियंका राजकारणात सक्रिय झाल्या तर पक्ष संघटनेची त्यांना जबाबदारी सांभाळू शकतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up will shine under youth icons akhilesh and rahul robert vadra
First published on: 24-01-2017 at 18:04 IST