UPI down Latest News Update : देशभरात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सेवा गुरुवारी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेक वापरकर्त्यांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागला.
रात्री साडेआठच्या सुमारास हजारो लोकांनी यूपीआय वापरताना अडचण येत असल्याचे डाउनडिटेक्टरवर रिपोर्ट केले. ही वेबसाईट आऊटेजची माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या स्रोतांकडून स्टेटस रिपोर्ट गोळा करते. दरम्यान यूपीआय सेवा विस्कळीत झाल्याने अनेक व्यावसायीकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. या वर्षात यूपीआय सेवा विस्कळीत होण्याची ही चौथी वेळ आहे.
गुगप पे, फोनपे, पेटीएम आणि इतर प्रमुख प्लॅटफॉर्मवर वापरकर्ते त्यांचे व्यवहार पूर्ण करू शकत नसल्याचे रिपोर्ट संध्याकाळी ७.४५ पासून येणे सुरू झाले. रात्री ८.३० पर्यंत सुमारे २,१४७ तक्रारी डाऊनडिटेक्टर या वेबसाईटवर नोंदवण्यात आल्या होत्या. ज्यापैकी ८० टक्के तक्रारी या पेमेंट करताना अडचण येत असल्याच्या होत्या.
या तांत्रिक बिघाडामुळे एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि कोटक महिंद्रा अशा प्रमुख बँकांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांना देखील याचा फटका बसला.
भारतातील डिजीटल पेमेंट क्षेत्रात यूपीआयचा मोठा दबदबा राहिला आहे, २०२४ मधील जवळपास ६५ टक्के व्यवहार हे यूपीआयच्या माध्यमातून झाल्याची माहिती फिनटेक फर्म Phi Commerce च्या रिपोर्टमधून समोर आली आहे. लहान आणि मध्यम मुल्यांच्या व्यवहारांसाठी यूपीआय मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तर क्रेडिट कार्ड, ईएमआय ही माध्यमे हेल्थ केअर, शिक्षण आणि वाहन या क्षेत्रात वापरले जाते.