भारतात अत्यंत अवघड अन् प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सनदी सेवांच्या परीक्षेत यशस्वी तसेच अन्य उमेदवारांना प्राप्त झालेले प्रत्येक टप्प्यावरील गुण, केंद्रीय लोकसेवा आयोगाने आजवरच्या परीक्षेच्या इतिहासात प्रथमच जाहीर केले आहेत. सामान्यपणे अंतिम निकालानंतर मुख्य परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे गुण त्या त्या उमेदवारांनाच पाहू देण्याचा आयोगाचा शिरस्ता होता. मात्र यंदा आयोगाने पारदर्शकतेच्या दृष्टीने आश्वासक पाऊल उचलत गुण जाहीर केले आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे सनदी सेवांसाठीची परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते. आजवर या परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारांनी मिळवलेले गुण, तसेच पुढील टप्प्यासाठी ठरविले गेलेले किमान पात्रता गुण हे आयोगाकडून कधीच जाहीर केले जात नसत. मात्र या वेळी आपला जुना शिरस्ता मोडीत काढत आयोगाने यशस्वी तसेच अपात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचे पूर्वपरीक्षेचे गुण तसेच मुख्य परीक्षेस पात्र ठरण्यासाठी आवश्यक असलेले किमान पात्रता गुण आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या गुणांचा विचार केला असता एकूण २२५० गुणांच्या या परीक्षेत ११९३ गुण प्राप्त करीत हरिता कुमार यांनी अग्रस्थान पटकाविले. भारतातून दुसरा येण्याचा मान मिळवणाऱ्या व्ही. श्रीराम यांनी ११४९, तर तिसऱ्या आलेल्या स्तुती चरण यांनी ११४८ गुण मिळवले.
या यादीनुसार सन २०१२ च्या परीक्षा प्रक्रियेतून १००४ उमेदवारांची अधिकारीपदासाठी निवड करण्यात आली. आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या सर्वच टप्प्यांवरील गुण जाहीर करण्यामागे पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढविणे एवढाच हेतू असल्याचे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आजवर यशस्वी उमेदवारांना पोस्टाद्वारे गुणपत्रिका पाठविल्या जात असत. मात्र गेल्या काही वर्षांत या प्रक्रियेबद्दल उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर होता. आता नव्या निर्णयामुळे उमेदवार अधिक विश्वासाने या परीक्षांना सामोरे जातील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.