US Airstrikes Iran Updates : गेल्या काही दिवसांपासून इस्रायल-इराणमध्ये संघर्ष सुरु आहे. इस्रायल आणि इराणमध्ये हवाई हल्ले सुरु आहेत. या दोन्ही देशांच्या संघर्षात आता अमेरिका सहभागी झाली असून अमेरिकेने इराणवर आज मोठे हवाई हल्ले केले आहेत. इराणमधील ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या संदर्भातील माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल माध्यमावर दिली आहे.

अमेरिकेने इराणमधील ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले करत ते नष्ट केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. तसेच इराणवर हवाई हल्ला करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय इतिहास बदलेल, असं बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी त्यांच्या बी २ बॉम्बरचा वापर केला आहे. इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेच्या बी-२ बॉम्बर्सनी तब्बल ३७ तास नॉनस्टॉप उड्डाण केलं, एवढंच नाही तर इंधन देखील हवेतच भरलं आणि त्यानंतर अमेरिकेच्या बी-२ बॉम्बर्सनी इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केला. या संदर्भातील वृत्त अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने आणि यॉर्क टाईम्सच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

अमेरिकेच्या मिसूरी येथून निघालेल्या बी-२ बॉम्बर्सनी इराणमधील अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केला आणि परत येण्यापूर्वी हवेत अनेक वेळा इंधन भरलं आणि तब्बल ३७ तासांपेक्षा जास्त प्रवास केला. तब्बल २ अब्ज डॉलर्स किमतीचं हे प्रगत विमान मिसूरी एअरबेसपासून इराणमध्ये पोहोचलं, त्या ठिकाणी इराणमधील तीन अणुऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ला केला आणि त्यानंतर पुन्हा अमेरिकेत परतंल. या संपूर्ण प्रवासात अंदाजे ११,४०० किलोमीटर अंतर या विमानाने कापलं.

या कारवाई दरम्यान फोर्डोवरील हल्ल्यात सहा बंकर-बस्टर बॉम्ब वापरण्यात आले, तर ३० टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी इतर दोन अणुस्थळांना लक्ष्य केल्याचं सांगितलं जात आहे. रविवारी पहाटे अमेरिकेने एक मोठं पाऊल उचललं आणि बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स आणि बंकर-बस्टर बॉम्बचा वापर करून इराणमधील अणुऊर्जा केंद्रांवर मोठा हवाई हल्ला केला. हल्ल्यानंतर लगेचच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याची माहिती दिली.

बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स म्हणजे काय?

बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स हे अमेरिकन हवाई दलाचं महत्वाच्या विमानांपैकी एक विमान आहे. सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेलं हे विमान आहे. तसेच उंचीवरील आणि सर्वात अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रांमध्ये प्रवेश करण्याची क्षमता या विमानात आहे.

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात नष्ट झालेले ३ अणुकेंद्र कोणते?

अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकन आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या कारवाईत अमेरिकन स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू-५७ बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आले. जे मजबूत भूमिगत टार्गेट करण्यास सक्षम आहेत. दरम्यान, अमेरिकेने इराणमधील ३ अणुकेंद्रावर हल्ला केला. यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ला केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.