Dmitry Medvedev On US Airstrikes Iran Updates : इस्रायल-इराणमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. कारण इस्रायल आणि इराण संघर्षात आता अमेरिका सहभागी झाली असून अमेरिकेने इराणवर आज मोठे हवाई हल्ले केले. इराणमधील ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले केल्यामुळे इराण आक्रमक प्रत्युत्तर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतचा इशारा इराणने दिला आहे. अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.
अमेरिकेने इराणवर तीन अणुकेंद्रावर हल्ला केल्यानंतर आता जगभरातील अनेक देशांच्या भूमिका समोर येत आहेत. चीन, पाकिस्तानसह आदी देशांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. यानंतर आता रशियातील काही नेत्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इराणी अणु अणुकेंद्रावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर अनेक देश इराणला अण्वस्त्रे पुरवण्यास तयार असल्याचा मोठा दावा रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दिमित्री मेदवेदेव यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं की, “फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील स्थळांना लक्ष्य करतांना अमेरिकेचं ऑपरेशन केवळ त्यांचं उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी ठरलं नाही तर प्रत्यक्षात उलट परिणाम झाला आहे. पण इराणमधील अणु केंद्रावर रात्रीच्या वेळी केलेल्या हल्ल्यांमुळे अमेरिकन लोकांनी काय साध्य केलं?”, असा प्रश्न दिमित्री मेदवेदेव यांनी विचारला आहे.
फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानवरील अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांचा संदर्भ देत दिमित्री मेदवेदेव यांनी असा दावा केला की “अणु इंधन चक्रातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर कोणताही परिणाम झाला नाही किंवा त्यांना फक्त किरकोळ नुकसान झालं असेल. तसेच आपण स्पष्टपणे म्हणू शकतो की भविष्यात अणु शस्त्रांचं उत्पादन सुरूच राहील. तसेच अनेक देश इराणला त्यांचं स्वतःची अण्वस्त्रे थेट पुरवण्यास तयार आहेत”, असा दावा दिमित्री मेदवेदेव यांनी केला.
“इराणची राजकीय व्यवस्था टिकून राहिली आहे आणि बहुधा ती आणखी मजबूत झाली. या हल्ल्यांमुळे इराणला देशांतर्गत पाठिंबा मजबूत करण्यास मदत झाली आहे. लोक देशाच्या नेतृत्वाभोवती एकत्र येत आहेत, ज्यात पूर्वी विरोध करणारे लोक देखील समाविष्ट आहेत, असं दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटलं आहे. तसेच दिमित्री मेदवेदेव यांनी अमेरिकेची विशेषतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पची खिल्ली उडवली आहे. एकेकाळी शांततेचे अध्यक्ष म्हणून गौरवले जाणारे ट्रम्प आता अमेरिकेला दुसऱ्या युद्धात ढकलत असल्याचा आरोप दिमित्री मेदवेदेव यांनी केला आहे.
अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात नष्ट झालेले ३ अणुकेंद्र कोणते?
अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकन आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या कारवाईत अमेरिकन स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू-५७ बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आले. जे मजबूत भूमिगत टार्गेट करण्यास सक्षम आहेत. दरम्यान, अमेरिकेने इराणमधील ३ अणुकेंद्रावर हल्ला केला. यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ला केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.