US-China Trade war: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी चीनला लक्ष्य करत नव्याने टॅरिफ लादण्याची घोषणा केली. १ नोव्हेंबरपासून चीनच्या सर्व वस्तूंवर अतिरिक्त १०० टक्के आयातशूल्क (टॅरिफ) आकारले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच अमेरिकेत निर्माण केलेल्या क्रिटिकल सॉफ्टवेअरवरही कठोर नियंत्रणे आणण्याची योजना त्यांनी जाहीर केली. यापुढे असे सॉफ्टवेअर निर्यात करण्यावर बंधने येतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नव्या भूमिकेमुळे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रुथ या सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली. चीनच्या व्यापार धोरणावर त्यांनी टीका करत म्हटले की, चीनने व्यापारात असाधारण अशी आक्रमकता अवलंबली आहे. त्याचा परिणाम जगातील सर्व देशांवर होईल. चीनच्या धोरणांना अमेरिका कठोरपणे प्रत्युत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला.

ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले, “१ नोव्हेंबर २०२५ पासून (किंवा त्याआधी, चीन काय निर्णय घेतो हे पाहून) अमेरिका चीनच्या सर्व आयातीवर १०० टक्के टॅरिफ लादत आहे. सध्या लागू असलेल्या टॅरिफ व्यतिरिक्त हे नवे शुल्क असेल. तसेच १ नोव्हेंबर पासून आम्ही अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या क्रिटिकल सॉफ्टवेअरवरही नियंत्रण आणू.”

https://truthsocial.com/@realDonaldTrump/posts/115351840469973590

१०० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय का?

ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानुसार, चीन त्यांच्या अनेक उत्पादनांवर निर्यात निर्बंध लादण्याचा विचार करत आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत असमतोल निर्माण होण्याचा धोका उद्भवतो. या वृत्ताला प्रत्युत्तर देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर कडक निर्बंध लादल्याचे सांगितले जात आहे.

“चीनने व्यापाराबाबत कमालीची आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी जगातील देशांना एक पत्र पाठविल्याचे कळले. ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, १ नोव्हेंबर २०२५ पासून ते त्यांच्या उत्पादनांवर आणि त्यांच्या देशात तयार होणाऱ्या इतर देशांच्या उत्पादनांवर निर्यात नियंत्रणे लादणार आहेत. याचा परिणाम निश्चितच अनेक देशांवर होईल. याची तयारी त्यांनी काही वर्षांपूर्वीच केल्याचे दिसते. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीकोनातून ही धक्कादायक गोष्ट असून इतर राष्ट्रांचा हा नैतिक अपमान आहे”, अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

शी जिनपिंग यांच्याबरोबरची बैठक रद्द करण्याचे संकेत

दरम्यान ट्रम्प यांनी आणखी एक पोस्ट लिहून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबरची नियोजित भेट रद्द करण्याचेही संकेत दिले आहेत. ते म्हणाले, “दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या APEC शिखर परिषदेत मी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार होतो. पण आता असे करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही.”

ट्रम्प यांच्या निर्णयावर तज्ज्ञांचे मत काय?

आर्थिक तज्ज्ञांच्या मतानुसार, ट्रम्प यांचा ताजा निर्णय केवळ आर्थिक नाही तर राजकीय रणनीतीचाही भाग आहे. एबीपी लाईव्हने वॉशिंग्टन येथील विश्लेषक डॉ. अलेक्झांडर मिशेल यांची एक प्रतिक्रिया उद्धृत केली आहे. मिशेल यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांचा निर्णय हा नव्या व्यापार युद्धाचा संकेत आहे. अमेरिकेतील उत्पादनांचे रक्षण करून चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा त्यांचा परिणाम आहे. तसेच त्यांनी चीनला इशाराही दिला आहे. चीनने प्रत्युत्तरादाखल कोणताही अनुचित निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होईल.