US Court Declares Trump Tariffs Illegal: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाने मोठा झटका दिला आहे, त्यांनी लादलेले बहुतेक टॅरिफ बेकायदेशीर असल्याचे घोषित करण्यात आले आहे. असे टॅरिफ लादण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही यावर न्यायालयाने जोर दिला. दरम्यान, न्यायलयाच्या या निर्णयावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली असून, या निर्णयाला दुर्दैवी म्हटले आहे आणि हा निर्णय देशासाठी विनाशकारी ठरेल असे म्हटले आहे.
अमेरिकन न्यायालयाने काय म्हटले आहे?
अमेरिकन न्यायालयाने यावर भर दिला आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्याचा गैरवापर केला आहे आणि त्या कायद्याने त्यांना दिलेल्या अधिकारांच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. न्यायालयाने असेही मान्य केले आहे की, टॅरिफ लादण्याच्या निर्णयाला अमेरिकन काँग्रेसची परवानगी असणे आवश्यक आहे.
ट्रम्प यांच्याकडे आता कोणते पर्याय आहेत?
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देत, अमेरिकेतील न्यायालयाने असा निर्णय दिला की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना प्रत्येक देशावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादण्याचा कायदेशीर अधिकार नाही. पण सध्या विविध देशांवर लादलेले टॅरिफ कायम ठेवण्याची परवानगी दिली. यामुळे आता ट्रम्प यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ मिळणार आहे.
आयात कर लादण्यासाठी ट्रम्प यांच्याकडे पर्यायी कायदे आहेत, परंतु ते त्यांच्या कृतीचा वेग आणि तीव्रता मर्यादित करतील.
उदाहरणार्थ, मे महिन्यात दिलेल्या निर्णयात, व्यापार न्यायालयाने असे नमूद केले होते की, ट्रम्प यांच्याकडे १९७४ च्या व्यापार कायद्यानुसार तसेच इतर कायद्यांनुसार, व्यापार तूट भरून काढण्यासाठी टॅरिफ लादण्याचे मर्यादित अधिकार आहेत. परंतु त्या कायद्यांनुसार ज्या देशांसोबत अमेरिकेची मोठी व्यापार तूट आहे अशा देशांवर १५ टक्के आणि फक्त १५० दिवसांपर्यंत टॅरिफ लादता येते.
टॅरिफ प्रकरण न्यायालयात कसे पोहोचले?
खरे तर, हे प्रकरण दोन कायदेशीर दाव्यांमुळे न्यायालयात पोहोचले आहे. एक कायदेशीर दावा एका अमेरिकन उद्योगपतीने दाखल केला होता, तर दुसरा १२ डेमोक्रॅटिक शासित राज्यांनी. यावरून हे स्पष्ट होते की, टॅरिफ लादण्याचा निर्णय घेताना काँग्रेसकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कोणत्याही परवानगीशिवाय नवीन व्यापार धोरण बनवले आहे.
न्यायालयाच्या निर्णयाबद्दल ट्रम्प प्रशासन काय म्हणाले?
ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की, अशा निर्णयाचा राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम होतो, आंतरराष्ट्रीय करारांवरही परिणाम होतो. स्वतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय नाकारला आहे, अगदी असे म्हटले आहे की, यामुळे अमेरिका नष्ट होईल.
अमेरिकेचे रक्षण करण्यासाठी टॅरिफ हे एक साधन
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, टॅरिफ हे “मेड इन अमेरिका” उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशाची आर्थिक ताकद वाढवण्यासाठी सर्वात मजबूत शस्त्र आहे.
“अनेक वर्षांपासून, आमच्या बेफिकीर आणि मूर्ख राजकारण्यांनी आमच्याविरुद्ध टॅरिफ वापरण्याची परवानगी दिली. आता, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीने, आम्ही टॅरिफचा वापर आमच्या देशाच्या फायद्यासाठी करू आणि अमेरिका पुन्हा श्रीमंत, मजबूत आणि शक्तिशाली बनवू!”, असे ट्रम्प म्हणाले.