बुसान : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची गुरुवारी दक्षिण कोरिया येथे घेतलेली भेट अतिशय यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. अमेरिका चीनवरील करात कपात करणार असून, चीनही दुर्मीळ खनिजांच्या निर्यातीवरील निर्बंध शिथिल करणार आहे. तसेच, चीन अमेरिकेकडून सोयाबीनची खरेदी करणार आहे. चीनबरोबर लवकरच व्यापार करार केला जाईल, असे ते म्हणाले.

जिनपिंग आणि ट्रम्प यांच्यात १०० मिनिटे चर्चा झाली. दक्षिण कोरियातील बुसान येथे दोन्ही नेते एकमेकांना भेटले. याच ठिकाणी आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषद झाली. भेटीनंतर ट्रम्प अमेरिकेला रवाना झाले. ट्रम्प म्हणाले, ‘अमेरिकेने चीनवर लागू केलेला कर १० टक्क्यांनी कमी केला जाईल. फेंटानिल तयार करण्यासाठी, रसायन विकण्यासाठी दंड म्हणून चीनवर कर लागू केला होता. त्यामुळे चीनवरील एकूण कर ५७ वरून ४७ टक्के इतका होईल.’

ट्रम्प यांनी पुढील वर्षी एप्रिलमध्ये चीनला भेट देऊ असे सांगितले, तर जिनपिंगही त्यानंतर कधी तरी अमेरिकेला भेट देतील, असे विधान केले. चीनला अत्याधुनिक कम्प्युटर चिप्सची निर्यात करण्यासंदर्भातही चर्चा झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

अमेरिकेबरोबर एकत्र काम करण्याची इच्छा

जिनपिंग यांनी अमेरिकेबरोबर एकत्र काम करण्याची इच्छा दर्शविली. जिनपिंग म्हणाले, ‘दोन्ही देशांतील राष्ट्रीय स्थिती वेगळी असल्याने आपण प्रत्येक वेळी एकमेकांकडे बघू शकत नाही. दोन आघाडीच्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये कायमच थोडे तणाव असतात. ही स्थिती सामान्य आहे.’ चीनने ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या बैठकीवर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अणूऊर्जेवरील पाणबुडीसाठी तंत्रज्ञान देणार

गिआंगजू (दक्षिण कोरिया) : अणूऊर्जेवर चालणारी पाणबुडी तयार करण्यासाठी अमेरिका दक्षिण कोरियाला तंत्रज्ञान पुरवेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सामाजिक माध्यमावर पोस्ट केली.

‘अमेरिकाही करणार अण्वस्त्रचाचण्या’

बुसानः अमेरिका तीन दशकांनंतर अण्वस्त्रचाचण्या पुन्हा सुरू करील. रशिया आणि चीनशी समान अशा या चाचण्या असतील, असे विधान ट्रम्प यांनी केले. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याबरोबरील चर्चेच्या काही मिनिटे आधी सामाजिक माध्यमावर त्यांनी या संदर्भात टिप्पणी केली. अमेरिका अण्वस्त्रे डागू शकणाऱ्या क्षेपणास्त्रांची नियमितपणे चाचणी करते. पण, १९९२ पासून अणुचाचणी अमेरिकेने केलेली नाही. ट्रम्प यांनी टिप्पणी केली, ‘इतर देश त्यांच्या प्रकल्पांची चाचणी करीत असल्यामुळे मी युद्ध विभागाला समान धर्तीवर अमेरिकेने अण्वस्त्रचाचणी करावी, अशा सूचना दिल्या आहेत. ही प्रक्रिया लगेच सुरू केली जाईल.’ व्हाइट हाउसने यावर अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

चीनची अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी

वॉशिंग्ट : चीनने कराराचा भाग म्हणून दरवर्षी २५ दशलक्ष मेट्रिक टन अमेरिकन सोयाबीन खरेदी करण्यास सहमती दर्शविली आहे, असे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी गुरुवारी सांगितले. हा करार तीन वर्षांसाठी आहे. आमच्या सोयाबीन शेतकऱ्यांची आगामी काळात भरभराट होईल, असेही बेसेंट म्हणाले.