Harvard University : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेत हार्वर्ड विद्यापीठाला धक्का दिला होता. विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची पात्रता ठेवणाऱ्या अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाचे प्रमाणपत्र ट्रम्प प्रशासनाने २३ मे रोजी रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे हार्वर्डला २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. त्यामुळे या निर्णयाचा फटका हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळे या निर्णयाची जगभरात मोठी चर्चा सुरु आहे.

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात हार्वर्ड विद्यापीठाने फेडरल न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाला न्यायाधीशांनी तुर्तास स्थगिती दिली होती. त्यानंतर आता हार्वर्ड विद्यापीठाला विदेशी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यापासून रोखण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाला न्यायाधीशांनी दिलेली स्थगिती पुन्हा एकदा वाढवली आहे. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाला आणखी एक धक्का बसला आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, अमेरिकेतील न्यायाधीश अ‍ॅलिसन बुरोज यांनी हार्वर्डची मागणी प्राथमिक स्थरावर मान्य केली आणि खटला पूर्णपणे निकाली निघेपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाची कोणतीही कारवाई स्थगित करण्याचा निर्णय दिला. गेल्या आठवड्यात जारी केलेल्या तात्पुरत्या प्रतिबंधात्मक आदेशावर हा निर्णय आधारित आहे. गेल्या शुक्रवारी डीएचएस सचिव क्रिस्टी नोएम यांनी फेडरल स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर प्रोग्राम अंतर्गत विद्यापीठाचे प्रमाणपत्र रद्द केलं होतं. त्यानंतर हार्वर्डने होमलँड सिक्युरिटी विभागाच्या (डीएचएस) विरोधात खटला दाखल केला होता.

‘हार्वर्ड विद्यापीठाने ३१ नव्हे तर १५ टक्के मर्यादा ठेवावी’

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते हार्वर्ड विद्यापीठात अनेक विदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण ही संख्या कमी केल्याने हार्वर्डसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अमेरिकन विद्यार्थ्यांसाठी संधी वाढेल. ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, “मला वाटतं की, हार्वर्ड विद्यापीठाने ३१ टक्के नव्हे तर १५ टक्के मर्यादा ठेवली पाहिजे. आपल्याकडे असे लोक आहेत ज्यांना हार्वर्डमध्ये जायचं आहे, शिक्षण घ्यायचं आहे, पण ते प्रवेश घेऊ शकत नाहीत. कारण आमच्याकडे विदेशी विद्यार्थी आहेत. हार्वर्ड प्रशासनाने आता सुधारणा करायला हवी”, असं ट्रम्प यांनी नुकतंच म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अनुदान रोखण्याचा दिला होता इशारा

काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठाला अनुदानाबाबत इशारा दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की, “आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की हे विदेशी विद्यार्थी कोण आहेत? ही आमची रास्त मागणी आहे. कारण आम्ही हार्वर्डला अब्जावधी डॉलर्स देतो. परंतु हार्वर्ड या प्रकरणाची माहिती देत ​​नाही. आम्हाला त्या सर्व विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या देशांची नावे हवी आहेत. अन्यथा हार्वर्डकडे स्वतःचे $५२,०००,००० आहेत आणि त्यांनी ते वापरावे आणि सरकारकडून कोणतंही अनुदान मागू नये”, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठाला इशारा दिला होता.