US Firm Signs 5ooml Dollar Deal With Pakistan: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार तणाव वाढल्यापासून, अमेरिका सातत्याने पाकिस्तानला जवळ करत असल्याचे दिसत आहे. अशात आता मिसूरीस्थित यूएस स्ट्रॅटेजिक मेटल्सने देशाच्या खनिज क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी पाकिस्तानबरोबर ५०० दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षरी केली आहे.
महत्त्वाच्या खनिजांचा सर्वात मोठा खाण उत्पादक असलेल्या पाकिस्तानच्या फ्रंटियर वर्क्स ऑर्गनायझेशनने, सोमवारी अमेरिकन कंपनीबरोबर सामंजस्य कराराद्वारे कराराची औपचारिकता पूर्ण केली. या करारामुळे पाकिस्तानमध्ये पॉली-मेटॅलिक रिफायनरी स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.
गेल्या महिन्यात अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या व्यापार करारानंतर हा करार झाला आहे. पाकिस्तानला आशा आहे की त्यांच्या विशाल खनिज आणि तेल साठ्यांमध्ये अमेरिकेच्या गुंतवणुकीला यामुळे प्रोत्साहन मिळेल, असे एपी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
यूएस स्ट्रॅटेजिक मेटल्स ही कंपनी महत्त्वाची खनिजे तयार करण्यात आणि त्यांचा पुनर्वापर करण्यात विशेषज्ञ आहे. या कंपनीला अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने प्रगत उत्पादन आणि ऊर्जा तंत्रज्ञानासाठी महत्त्वाची कंपनी म्हणून मान्यता दिली आहे.
पाकिस्तानच्या नॅशनल लॉजिस्टिक्स कॉर्प आणि अभियांत्रिकी व बांधकाम क्षेत्रातील दिग्गज पोर्तुगीज कंपनी मोटा-एंजिल ग्रुप यांच्यातही एक करार झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, त्यांनी पाकिस्तानच्या तांबे, सोने, दुर्मिळ आणि इतर खनिज संसाधनांवर यूएस स्ट्रॅटेजिक मेटल्स आणि मोटा-एंजिलच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी मूल्यवर्धित सुविधा उभारण्यासाठी, खनिज प्रक्रिया क्षमता वाढवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात खाण प्रकल्प हाती घेण्यावर सहमती दर्शविली आहे. ही भागीदारी पाकिस्तानमधून सहज उपलब्ध असलेल्या खनिजांच्या निर्यातीसह त्वरित सुरू होईल, ज्यात अँटीमनी, तांबे, सोने, टंगस्टन आणि दुर्मिळ पृथ्वी खनिजांचा समावेश आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, शरीफ म्हणाले होते की पाकिस्तानकडे ट्रिलियन डॉलर्सचे खनिज साठे आहेत. यामधील परकीय गुंतवणूक देशाला त्याच्या दीर्घ आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास आणि मोठ्या प्रमाणात परदेशी कर्जांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करू शकते.
पाकिस्तानची बहुतेक खनिज संपत्ती बंडखोरीग्रस्त नैऋत्य बलुचिस्तान प्रांतात आहे, जिथे फुटीरतावादी गटांनी स्थानिक आणि परदेशी कंपन्यांद्वारे होणाऱ्या खनिज कामास विरोध केला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बलुचिस्तान नॅशनल आर्मी आणि त्याची सशस्त्र शाखा, माजिद ब्रिगेड यांना परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते.