PM Narendra Modi Stand Against Donald Trump Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदी करत असल्यामुळे भारतावर अतिरिक्त अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादला आहे. यामुळे भारतावरील एकूण टॅरिफ ५० टक्के झाल्याने, अमेरिका-भारत व्यापार संबंध ताणले गेले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या एका माजी अधिकाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडक भूमिकेचे कौतुक केले आहे.

“भारताच्या हक्कांसाठी पंतप्रधान मोदी उभे राहीले आहेत आणि इतिहास भविष्यात याची नक्कीच नोंद घेईल. मोदींच्या भूमिकेमुळे अमेरिकेला खरोखरच धडा मिळाला की, तुम्ही भारताला धक्का देऊ शकत नाही”, असे मिचेल रुबिन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले. तसेच या प्रकरणात ट्रम्प यांनी भारताला लक्ष्य करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

१५ ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात होणाऱ्या चर्चेपूर्वी अमेरिकेच्या माजी सुरक्षा अधिकाऱ्याचे हे विधान आले आहे.

अमेरिकेच्या दुटप्पी धोरणावर टीका

रशियासोबतच्या ऊर्जा व्यापाराबाबत अमेरिकेच्या दुटप्पी धोरणावर टीका करताना, मिचेल रुबिन पुढे म्हणाले, “अमेरिका रशियाकडून युरेनियम हेक्साफ्लोराइड आणि इतर धोरणात्मक खनिजे खरेदी करते. अमेरिका अझरबैजानमधून येणाऱ्या गॅसबद्दल इष्टतम बोलते, तर त्याचा बहुतांश पुरवठा रशियन किंवा इराणी आहे.”

“भारताने आपल्या हक्कांसाठी उभे राहणे योग्य आहे. हे प्रकरण संपल्यानंतर, भारत-अमेरिका संबंध लक्षणीयरीत्या सुधारतील”, असे ते पुढे म्हणाले.

व्यापक भू-राजकीय परिस्थितीबाबत, रुबिन यांनी ट्रम्प यांचे वर्णन “घोडेबाजार करण्याची सवय असलेला व्यापारी” असे केले, ज्याला हे समजत नाही की, “वाईट शांतता करार आणि नोबेल शांतता पुरस्कार जिंकण्याची महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात युद्ध वाढवू शकते.”

माजी उप-परराष्ट्रमंत्र्यांची टीका

अमेरिकेचे माजी उप-परराष्ट्रमंत्री कर्ट कॅम्पबेल यांनी सीएनबीसी इंटरनॅशनलला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांच्या भारतावरील टॅरिफ धोरणावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, या टॅरिफमुळे अमेरिका-भारत संबंध आता धोक्यात आले आहेत.

“अमेरिकेचे २१व्या शतकातील सर्वात महत्त्वाचे संबंध भारताशी आहेत. त्यापैकी बरेच काही आता धोक्यात आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान मोदींबद्दल ज्या पद्धतीने बोलले आहे, त्यामुळे भारत सरकार अडचणीत आले आहे”, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींना सल्ला

कर्ट कॅम्पबेल यांनी यावेळी भारताला सल्ला दिला की, “पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर गुडघे टेकू नयेत.” रशियाशी असलेल्या संबंधांबाबत अमेरिकेने भारतावर दबाव आणण्याचे उलट परिणाम होऊ शकतात. “जर तुम्ही भारताला सांगितले की रशियाशी असलेल्या संबंधांचा त्याग करावा लागेल, तर भारतीय रणनीतीकार अगदी उलट करतील,” असे कॅम्पबेल पुढे म्हणाले.