US President Donald Trump On Harvard University: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून निर्णयांचा धडाका लावला आहे. नवीन टॅरिफ धोरण, अमेरिकेतील कर्मचारी कपात, बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा यासह अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी हार्वर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास बंदी करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला.
एवढंच नाही तर हार्वर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांसाठी ६ अटींच्या पूर्ततेसाठी ७२ तासांची मुदत देण्यात आली होती. मात्र, यानंतर हार्वर्ड विद्यापीठ प्रशासनाने मोठं पाऊल उचलत ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का देत हार्वर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास बंदीच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळे हार्वर्ड विद्यापीठ प्रशासन आणि ट्रम्प प्रशासन हे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.
यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हार्वर्ड विद्यापीठावर टीका करत सूचक इशारा दिला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश न देण्याच्या निर्णयाचं ट्रम्प यांनी समर्थन केलं आहे. ट्रम्प यांनी या संदर्भात ट्रुथ सोशल माध्यमावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, “हार्वर्डमध्ये शिकणारे जवळपास ३१ टक्के विद्यार्थी विदेशातील आहेत. तसेच हार्वर्ड विद्यापीठाला वारंवार विनंती करूनही विद्यापीठ प्रशासन या विद्यार्थ्यांबद्दल तपशील देत नाही”, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?
“आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की हे विदेशी विद्यार्थी कोण आहेत? ही आमची रास्त मागणी आहे. कारण आम्ही हार्वर्डला अब्जावधी डॉलर्स देतो. परंतु हार्वर्ड या प्रकरणाची माहिती देत नाही. आम्हाला त्या सर्व विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या देशांची नावे हवी आहेत. अन्यथा हार्वर्डकडे स्वतःचे $५२,०००,००० आहेत आणि त्यांनी ते वापरावे आणि सरकारकडून कोणतंही अनुदान मागू नये”, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठाला इशारा दिला आहे.
हार्वर्ड विद्यापीठाने खटला दाखल करताना काय म्हटलं?
विद्यापीठाने ट्रम्प यांच्या या निर्णयाला अमेरिकन संविधान आणि इतर कायद्यांचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात हार्वर्ड विद्यापीठाने बोस्टन फेडरल कोर्टात तक्रार दाखल केली. हार्वर्ड विद्यापीठाने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, विदेशी विद्यार्थ्यांची प्रवेश बंदी केल्याने विद्यापीठावर आणि ७००० हून अधिक व्हिसा धारकांवर गंभीर परिणाम होतील. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने हार्वर्डच्या विद्यार्थ्यांचा एक चतुर्थांश भाग संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. तसेच हार्वर्डने ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध केला असून निर्णयाला बेकायदेशीर म्हटलं आहे. आम्ही या बेकायदेशीर कृतीचा निषेध करतो. हे हार्वर्डमधील हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणारे असल्याचं म्हटलं हार्वर्डने विद्यापीठाने म्हटलं आहे.