वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडेन यांनी माफी देण्यासाठी आणि इतर कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी ‘ऑटोपेन’ वापरल्याच्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
याशिवाय, अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृह-प्रतिनिधी सभागृहातील रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनीही बायडेन यांच्या निकटवर्तीय सदस्यांची चौकशी करण्याची ट्रम्प यांना विनंती केली आहे. ट्रम्प यांनी या प्रकरणाची चौकशी महान्यायवादी पाम बोंडी आणि व्हाइट हाऊसचे वकील डेव्हिड वॉरिंग्टन यांच्याकडे सोपवली आहे. बायडेन यांच्या काही कृती बेकायदा होत्या, त्यांच्या सहाय्यकांनी अध्यक्षांच्या अधिकारांचा गैरवापर केला, असाही आरोप ट्रम्प यांनी केला. अमेरिकन इतिहासातील हे एक षड्यंत्र असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
‘ऑटोपेन’ म्हणजे?
ऑटोपेन हे एक यांत्रिक उपकरण आहे, जे एखाद्या व्यक्तीच्या प्रामाणिक स्वाक्षरीची प्रत तयार करण्यासाठी वापरले जाते आणि ते अनेक दशकांपासून अमेरिकन अध्यक्ष वापरत आहेत.