Donald Trump On Iran-Israel War : इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेने मध्यस्थी करत युद्धसमाप्तीची घोषणा केली. त्यामुळे हा संघर्ष काहीसा निवाळल्याचं दिसून येत आहे. मात्र, इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेने उडी घेत इराणमधील तीन आण्विक तळांवर मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणमधील तीन आण्विक तळ नष्ट केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यानंतर ट्रम्प यांनी २४ जून रोजी इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रविरामाची घोषणा केली.

पण त्यानंतरही इस्रायल आणि इराणने शस्त्रविरामाचं उल्लंघन केल्याने ट्रम्प यांनी दोन्ही देशांवर संताप व्यक्त केला होता. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ला केल्यानंतर आता इराण पुन्हा अणुसंशोधन कार्यक्रम सुरू करणार नाही, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्र, इराणने पुन्हा अणुसंशोधन कार्यक्रम सुरू केल्यास अमेरिका पुन्हा इराणवर हल्ला करेल का? असा प्रश्न विचारला असता ट्रम्प यांनी एका शब्दांत उत्तर देत ‘नक्कीच’ असं म्हटलं. ते एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलत होते, असं वृ्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

अमेरिकेचा इराणला पुन्हा इशारा

दरम्यान, अमेरिकेने इराणमधील तीन आण्विक तळ नष्ट केल्याचा दावा केल्यानंतर आता इराणने पुन्हा आपल्या अणु सुविधांची पुनर्बांधणी सुरू केल्यास अमेरिकेने भविष्यात पुन्हा इराणवर हल्ला करण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे यावर इराण पुन्हा एकदा आपली भूमिका मांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच दुसरीकडे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी दावा केला की, बी-२ बॉम्बर्सनी इराणी अणु केंद्रावर हल्ला केल्यानंतर ते तीनही आण्विक तळ नष्ट झाले आहेत.

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात नष्ट झालेले ३ अणुकेंद्र कोणते?

अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकन आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या कारवाईत अमेरिकन स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू-५७ बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आले. जे मजबूत भूमिगत टार्गेट करण्यास सक्षम आहेत. अमेरिकेने इराणच्या ३ अणुकेंद्रावर केलेल्या हल्ल्यात फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान हे तीनही आण्विक तळ नष्ट झाल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.

“आता बॉम्ब टाकू नका, वैमानिकांनाही परत…”, डोनाल्ड ट्रम्प संतापले

डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रविरामाची घोषणा केल्यानंतरही इराणने तेल अवीववर नव्याने क्षेपणास्त्र डागल्याचा दावा इस्रायलने केला आणि हे शस्त्रविरामाचे उल्लंघन असल्याचं इस्रायलने म्हटलं. त्यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनीही इराणच्या शस्त्रविरामाच्या उल्लंघनाला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे निर्देश लष्कराला दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे ट्रम्प यांची मध्यस्थी अपयशी ठरल्याची चर्चा रंगली. मात्र, यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट करत इस्रायलवर नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी म्हटलं की, “आता बॉम्ब टाकू नका, जर तुम्ही असं केलं तर ते शस्त्रविरामाचं उल्लंघन ठरेल. तुम्ही तुमच्या वैमानिकांना आत्ताच परत बोलवा”, असं ट्रम्प यांनी इस्रायलला उद्देशून मंगळवारी म्हटलं होतं.