Donald Trump : इराण-इस्रायलमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष आता निवळला आहे. अमेरिकेने मध्यस्थी करत या दोन्ही देशातील युद्धसमाप्तीची घोषणा केली. पण या इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेनेही एन्ट्री करत इराणमधील ३ आण्विक तळांवर हल्ला करत इराणमधील ३ आण्विक तळ नष्ट केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यामुळे हा संघर्ष आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची परिस्थिती दिसत असतानाच ट्रम्प यांनी इराण-इस्रायलमध्ये युद्धसमाप्तीची घोषणा केली.
दरम्यान, अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या आण्विक तळांचं किती नुकसान झालं? अमेरिकेच्या हल्ल्यात आण्विक तळ नष्ट झाले का? ट्रम्प यांनी आण्विक तळ नष्ट केल्याचा दावा खरा आहे का? याबाबत सवाल विचारले जात असतानाच आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आणखी एकदा मोठा इशारा दिला आहे. इस्रायल आणि इराणमधील युद्धसमाप्तीनंतर इराणमध्ये जर आण्विक तळ पुन्हा विकसित करत असल्याचं गुप्तचर यंत्रणेने दाखवलं तर इराणवर कोणताही प्रश्न न करता पुन्हा लष्करी हल्ला करण्याचे आदेश देण्यास मागेपुढे पाहिलं जाणार नसल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. एएफपीच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांना एका पत्रकाराने विचारले की, जर गुप्तचर अहवालात असं आढळून आलं की इराण पुन्हा आण्विक तळ विकसित करत आहेत, तर तुम्ही पुन्हा त्या देशावर हल्ला करण्याचा विचार कराल का?, असा प्रश्न विचारला असता डोनाल्ड ट्रम्प मोजक्या शब्दांत उत्तर दिलं. ते म्हणाले की, “हो, निःसंशयपणे, अगदी कोणताही प्रश्न न करता.”
अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात नष्ट झालेले ३ अणुकेंद्र कोणते?
अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकन आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या कारवाईत अमेरिकन स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू-५७ बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आले. जे मजबूत भूमिगत टार्गेट करण्यास सक्षम आहेत. अमेरिकेने इराणच्या ३ अणुकेंद्रावर केलेल्या हल्ल्यात फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान हे तीनही आण्विक तळ नष्ट झाल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.
ट्रम्प यांच्यावर जपानचा संताप
ट्रम्प यांनी इराण-इस्रायलमध्ये युद्धसमाप्तीची घोषणा केली. पण या हल्ल्याबाबत सांगताना ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले हिरोशिमा-नागासाकीसारखे होते असं विधान केलं होतं. आता ट्रम्प यांच्या या विधानावरूनच जपानने संताप व्यक्त केला आहे. तसेच ट्रम्प यांनी इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यांची तुलना हिरोशिमा आणि नागासाकीच्या अणुबॉम्ब हल्ल्याशी केल्यानंतर जपानने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. नागासाकीच्या महापौरांसह स्थानिक नेत्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागासाकीचे महापौर शिरो सुझुकी यांनी ट्रम्प यांच्या टिप्पणीला उत्तर देताना म्हटलं की, “जर ट्रम्प यांच्या टिप्पण्या अणुबॉम्ब टाकण्याचं समर्थन करत असतील तर ज्या शहरावर बॉम्ब टाकण्यात आले होते त्या शहरासाठी हे अत्यंत खेदजनक आहे”, असं त्यांनी म्हटलं.